लासलगाव/हारुन शेख
एकीकडे कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढतील या अपेक्षेने नजरा लागलेल्या शेतकऱ्यांचा पाच दिवसाच्या सुट्टीनंतर बुधवारी बाजार समिती सुरू होताच भ्रमनिरास झाल्याचे चित्र पाहवयास मिळाले.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आणि राजस्थान, तसेच दक्षिणेकडील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांसह पश्चिम बंगालमधील सुखसागर या देशांतर्गत बाजारपेठेत नवीन उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने याचा परिणाम पाच दिवसांच्या मार्चअखेर आणि ईद सणानिमित्त सुट्ट्यानंतर २ एप्रिल रोजी आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात दोन ते तीनशे रुपयांची प्रतिक्विंटल घसरण झाली आहे. यामुळे कांद्याचे सरासरी बाजार भाव बाराशे ते तेराशे रुपयेपर्यंत येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या राज्य महसूल विभागातील सीमा शुल्क अधिनियम १९६२ च्या २५ (१) ने अध्यादेश काढत कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्याची या अध्यादेशात घोषणा करण्यात आली. त्यानुसार १ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपासून शून्य निर्यात शुल्क आकारात मुंबई पोर्टवरून तसेच देशाच्या विविध सीमा भागातून कांद्याची निर्यात ही विदेशात सुरू झाली. यामुळे व्यापाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र हे आनंदाचे क्षण काही तासही टिकू शकले नाही. ३१ मार्च अखेर आणि रमजान ईद या निमित्ताने २८ ते १ एप्रिल गेल्या पाच दिवसंपासून कांदा आणि भुसार शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद होते. मंगळवारी सकाळी लिलावचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. मंगळवारी बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव प्रारंभ होताच शेतकऱ्यांच्या कांद्याला काय भाव मिळणार याची उत्सुकता वाढलेली असताना कांद्याचे बाजारभाव वाढण्याऐवजी घसरल्याने कांदा उत्पादकांचे भ्रमनिरास झाले.
कांद्याच्या बाजारभावात काल दोनशे ते तीनशे रुपयांची प्रतिक्विंटल मागे वाढ होईल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या वाहनातून आणला होतो. कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समिती कांद्याचे लिलाव सुरू होताच गेल्या आठवड्याच्या तुलनेत २५० ते ३०० रुपयांच्या जवळपास घसरण झाल्याने कांद्याचे सरासरी बाजारभाव बाराशे ते तेराशे रुपयांपर्यंत येऊन पोहोचल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरसरी बाजारात तीनशे रुपयांच्या जवळपास घसरण झाली आहे.
- प्रवीण कदम, कांदा निर्यातदार व्यापारी व व्यापारी संचालक लासलगाव बाजार समिती
कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याऐवजी केंद्र सरकारच्या धोरणामुळेच कांद्याचे बाजार भाव कोसळले आहे मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन पर सबसिडी दिली पाहिजे अशी आमची मागणी असून या मागणीचा केंद्र व राज्य सरकारने विचार न केल्यास त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची राहील.
- भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना