भारतासमवेत व्यापार असंतुलन कमी करा; पुतीन यांचे आदेश; मोदी 'सूज्ञ' नेते असल्याची केली प्रशंसा 
बिझनेस

भारतासमवेत व्यापार असंतुलन कमी करा, पुतीन यांचे आदेश; मोदी 'सूज्ञ' नेते असल्याची केली प्रशंसा

भारताने कुणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतः ला अपमानित करून घेऊ नये. भारतावर दबाव टाकून इंधन आयात बंद करण्याचे प्रयत्न अमेरिकेच्या अंगलट येऊ शकतात, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेला दिला आहे.

Swapnil S

मॉस्को : भारताने कुणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतः ला अपमानित करून घेऊ नये. भारतावर दबाव टाकून इंधन आयात बंद करण्याचे प्रयत्न अमेरिकेच्या अंगलट येऊ शकतात, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेला दिला आहे. रशियाकडून इंधन आयात करू नये, यासाठी अमेरिका भारतावर आयात शुल्काच्या माध्यमातून दबाव टाकत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'सूज्ञ' नेते असून ते आंतरराष्ट्रीय दबावाखाली येणार नाहीत, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

पुतिन यांनी भारतासोबतच्या व्यापाराबाबत मोठी घोषणा केली आहे. आता दोन्ही देशांचे संबंध अजून मजबूत होतील. पुतिन म्हणाले की, भारत आणि रशिया फक्त व्यापार नाही, तर जागतिक मंचावरसुद्धा एकत्र मिळून काम करतात. पुतिन यांनी आता रशियन सरकारला भारतासोबतचे व्यापार असंतुलन कमी करण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सध्या भारत जितकी रशियाकडून तेल खरेदी करतो, त्या तुलनेत रशिया मात्र भारतीय सामानाची आयात करत नाही.

यावर्षी डिसेंबर महिन्यात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या या दौऱ्याबद्दल ते खूप उत्साहित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रशिया आता भारताकडून जास्त कृषी उत्पादने, औषधे आणि अन्य वस्तू खरेदी करण्याची योजना बनवत आहे. जेणेकरून दोन्ही देशांमध्ये व्यापार संतुलन चांगले राहील, असे पुतिन म्हणाले. हे व्यापार असंतुलन संपवण्यासाठी रशियाला पावले उचलावी लागतील. सरकारला यावर काम करण्यास सांगण्यात आले आहे, असे पुतिन यांनी स्पष्ट केले.

विश्वासू सहकारी

रशियाच्या दक्षिणेकडील शहर सोचीमध्ये आयोजित 'वल्दाई डिस्कशन क्लब 'मध्ये ते बोलत होते. पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. "भारत-रशियामध्ये कधी कुठला तणाव किंवा वाद राहिलेला नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेपासून रशिया भारताचा विश्वासू सहकारी राहिला आहे, असे पुतिन म्हणाले.

मोदींना आपले मित्र म्हटले

भारत रशियाची मदत कधी विसरलेला नाही. आजही दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि विश्वासाचे नाते कायम आहे, असे पुतिन म्हणाले. त्यांनी नरेंद्र मोदींना आपले मित्र म्हटले. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला पुतिन संतुलित, समजदार आणि देशहितासाठी काम करणारे सरकार मानतात.

नुकसानीची भरपाई केली

अमेरिकेचा दबाव असूनही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताचे कौतुक केले. या निर्णयामुळे भारताचा फक्त आर्थिक फायदाच झालेला नाही, तर स्वतंत्र आणि स्वयंभू धोरणाची देशाची प्रतिमा अजून मजबूत झाली आहे, असे पुतिन म्हणाले. अमेरिकेने लावलेले दंडात्मक टॅक्स भारतासाठी नुकसानदायक ठरले असते, पण भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून या नुकसानीची भरपाई केली. पुतिन यांनी याला एक साहसिक आणि दूरदृष्टीचा निर्णय म्हटले.

भारताकडून काय खरेदी करणार?

पुतिन म्हणाले की, रशियाला आता भारताकडून जास्त प्रमाणात धान्य, फळे, भाज्या आणि औषधे खरेदी करायची आहेत. भारत-रशिया व्यापारात लॉजिस्टिक्समध्ये अनेक आव्हाने आहेत. या समस्या सोडवून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अजून मजबूत होऊ शकतात.

...तर रशियाही अणुचाचण्या करणार - पुतिन

पुतिन यांनी आण्विक चाचण्या करण्यावरून अमेरिकेला धमकी दिली आहे. त्याचबरोबर अमेरिकेने युक्रेनला मिसाईल्स दिल्या तर संघर्षाचा भडका उडेल, असेही ते म्हणाले. काही देश आण्विक चाचण्या करण्याची तयारी करत आहेत. अण्वस्त्र असलेल्या महासत्तेने जर आण्विक चाचण्या केल्या, तर रशियाही या चाचण्या करील, अशी धमकीच पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला दिली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ट्रम्प रशियाच्या सैन्याला 'कागदी वाघ' म्हणाले होते. ट्रम्प यांच्या या टीकेलाही पुतिन यांनी उत्तर दिले. ते उपस्थितांना म्हणाले, आम्ही (रशिया) कागदी वाघ आहोत का, तर मग 'नाटो' काय आहे, असे म्हणत पुतिन यांनी ट्रम्प यांना डिवचले.

'शक्ती'चा तडाखा बसणार; ७ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीला धडकणार चक्रीवादळ; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा

दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला

चेंबूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ३३ जण ताब्यात

अंगणवाडी केंद्रे वाढणार; बालविवाह, हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन