बिझनेस

रुपयाने गाठली नवी नीचांकी पातळी; डॉलरच्या तुलनेत ६६ पैशांनी गडगडला,२ वर्षांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपयात सोमवारी दोन वर्षांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण झाली. सत्राच्या अखेरीस तब्बल ६६ पैशांनी रुपया गडगडून ८६.७० या नव्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

Swapnil S

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयात सोमवारी दोन वर्षांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण झाली. सत्राच्या अखेरीस तब्बल ६६ पैशांनी रुपया गडगडून ८६.७० या नव्या नीचांकी पातळीवर पोहोचला. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने सोमवारी रुपयाची घसरगुंडी झाली. इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये सोमवारी रुपया ८६.१२ वर उघडला आणि दिवसभरात ८६.११ वर गेला आणि सत्र बंद होण्याआधी ८६.७० या सर्वात कमी पातळीवर बंद होताना तब्बल ६६ पैशांनी गडगडला. एका सत्रात ६६ पैशांची घसरण ही ६ फेब्रुवारी २०२३ नंतरची सर्वात मोठी घसरण होती. तेव्हा रुपयाची ६८ पैशांची घसरण झाली होती.

भारतीय चलनाने ३० डिसेंबर रोजी ८५.५२ च्या बंद पातळीपासून गेल्या दोन आठवड्यांमध्ये १ टक्क्यापेक्षा जास्त घसरण पाहिली आहे.रुपयाने १९ डिसेंबर २०२४ रोजी प्रथमच ८५-प्रति डॉलरचा टप्पा ओलांडला होता.

एका दिवसात ५ पैशांची किरकोळ वाढ नोंदवल्यानंतर शुक्रवारी स्थानिक चलन १८ पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८६.०४ वर बंद झाले होते, तर मंगळवार आणि बुधवारच्या मागील सत्रांमध्ये ते अनुक्रमे ६ पैसे आणि १७ पैशांनी घसरले होते.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची अभूतपूर्व घसरण होण्याचे कारण म्हणजे अमेरिकन प्रशासनाने रशियामधील तेल आयातीवर निर्बंध लादणे, विदेशी बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत होणे आणि विदेशी गुंतवणूक संस्थांनी भारतीय शेअर बाजारामधून मोठ्या प्रमाणावर निधी काढून घेणे हे आहे.

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी २,२५४.६८ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. एक्स्चेंज डेटानुसार या महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय समभागांमधून २२,१९४ कोटी रुपये काढले आहेत. विश्लेषकांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँकेने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरात घसरण होत असताना हस्तक्षेप न केल्याने विदेशी गंगाजळीही मोठ्या प्रमाणावर घसरत आहे.

डॉलरची मागणी सतत वाढत असल्याने आणि पुरवठा कमी होत असल्याने रुपया कमकुवत होत आहे, असे अनिल कुमार भन्साळी, ट्रेझरी प्रमुख आणि कार्यकारी संचालक, फिनरेक्स ट्रेझरी ॲडव्हायजर्स एलएलपी म्हणाले.

अमेरिकेने रशियन तेल निर्यातीवर निर्बंध लादल्याने रुपया गडगडला

अमेरिकेने रशियन तेल निर्यातीवर निर्बंध लादल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया नवीन नीचांकी पातळीवर पोहोचल्याने देशांतर्गत शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला कारण विदेशी गुंतवणूकदारांनी स्थानिक शेअर बाजारातून निधी काढून घेणे सुरूच ठेवले. सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीला चालना मिळाली. मिड आणि स्मॉलकॅप समभागांमधून मोठ्या प्रमाणात निधी काढून घेतल्याने भावना आणखी खराब झाली. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने कठोर निर्बंध लादल्यानंतर क्रूडच्या किमती १ अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त वाढल्या. जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.४३ टक्क्यांनी वाढून ८०.९० अमेरिकन डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. मेहता इक्विटीज लिमिटेडचे ​​वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे म्हणाले, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशांतर्गत महागाईची चिंता वाढेल. त्यामुळे आरबीआयकडून व्याजदर कपातीची आशा नजीकच्या ते मध्यम कालावधीत लांबू शकते.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला