नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बाजारांपैकी एक असल्याने आता या देशाने सोन्याबाबत सर्वंकष राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे, असे भारतीय स्टेट बँकेने म्हटले आहे.
देशातील सर्वात मोठ्या व सार्वजनिक बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने याबाबत बुधवारी एक अहवाल प्रसिद्ध केला. जगभरात सोन्याच्या किंमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असताना भारताविषयीचे बँकेचे हे मत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
`कमिंग ऑफ (अ टर्ब्युलंट) एज : द ग्रेट ग्लोबल गोल्ड रश` शीर्षकाच्या या अहवालानुसार, भूराजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता आणि अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन या कारणांमुळे सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.
२०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये काही दिवस सोन्याची किंमत ४ हजार अमेरिकन डॉलर प्रति औंसपेक्षा कमी झाली होती. परंतु नोव्हेंबरमध्ये ती पुन्हा ४ हजार डॉलरच्या वर गेली.
भारतातील देशांतर्गत सोन्याचा पुरवठा एकूण पुरवठ्याच्या केवळ अल्पांश आहे. तर २०२४ मध्ये ८६ टक्के सोने आयातीद्वारेच देशात येते (वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अंदाज), असे अहवालात नमूद आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बाजारांपैकी एक असून संस्कृतीतील सोन्याविषयी आकर्षण, गुंतवणुकीची मागणी, चलनवाढीपासून बचावाचे साधन आणि सुरक्षित गुंतवणूक या कारणांनी सोन्याची मागणी कायम आहे.
२०२४ मध्ये भारतातील एकूण ग्राहक सोन्याची मागणी ८०२.८ टनांवर पोहोचली. ती जागतिक मागणीच्या २६ टक्के होती. चीन (८१५.४ टन) नंतर भारताचा क्रमांक दुसरा आहे.
बँकांचे सोन्यावरील वाढते आकर्षण
अमेरिका आणि जर्मनीकडे त्यांच्या एकूण राखीव निधीपैकी ७७% हून अधिक हिस्सा सोन्याच्या स्वरूपात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे चालू आर्थिक वर्षात १० ऑक्टोबरपर्यंत १५.२% राखीव निधी सोन्याच्या स्वरूपात होता. तो गेल्या आर्थिक वर्षामध्ये १३.८% आणि त्याआधीच्या आर्थिक वर्षात ९.१% होता.
अहवालातील निरीक्षणे...
घराघरांत जपले जाणारे, गुंतवणूकदारांनी पसंत केलेले, मध्यवर्ती बँकांनी साठवलेले आणि सट्टेबाजांनी वापरलेले सोने या चमकदार धातूचा अलीकडचा प्रवास एखाद्या कादंबरीसारखा आहे. मात्र, हेच वेळोवेळी आर्थिक वादळांचे संकेतही देते. म्हणूनच भारताने आता दीर्घकालीन, स्थानिक उत्पादनाला चालना देणारे सोन्याचे धोरण आखणे गरजेचे आहे. सोन्याच्या किंमतींचा डॉलर-रुपया विनिमय दरावर थेट परिणाम होतो.
नव्या खाणींची शक्यता
भारतातील देशांतर्गत सोन्याचे उत्पादन अत्यल्प आहे. १,६२७ किलो सोने खाणकामातून मिळाले. अलीकडे ओडिशा, मध्य प्रदेशातील जबलपूर आणि आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात नवीन सोन्याच्या खाणी सापडल्या. त्यामुळे चालू खाते तुटीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.