संग्रहित छायाचित्र 
बिझनेस

‘ते’ सध्या काय करतात?

Swapnil S

- विरेंद्र तळेगांवकर

अर्थपूर्ण

विभाजन ते विस्मरण असा एकेकाळच्या आघाडीच्या उद्योगपतीचा प्रवास एक अर्थ पत्रकार म्हणून अनुभवता आला. विभाजनानंतर उमेदीच्या काळातला समूह आणि त्याच्या अनेक उपकंपन्या आणि त्यासंबंधाने होणाऱ्या आर्थिक घडामोडी आणि त्याअनुषंगाने होणाऱ्या तातडीच्या पत्रकार परिषदा. बॅलार्ड पिअरच्या त्या निर्मनुष्य गल्लीत तेवढ्याच सजवलेल्या हेरिटेज बिल्डिंगमधील रिलायन्स-एडीएजीची निमंत्रणे आणि नवागत समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचे आदरातिथ्य असे सारेच इव्हेंटमयी होते. कोट्यवधीच्या आकड्यांनी प्रेस रिलिज भरायचे आणि देशी-विदेशी गुंतवणूकदार-भागीदारांच्या चेहऱ्यांनी कॅमेऱ्याचे रोलही. आज हे सारे शांत झाले आहे. अगदी त्या गल्लीसारखे आणि उद्योग क्षेत्रातील घडामोडीसारखेही...

तो दिवस अजूनही लख्ख आठवतो. एका पांढऱ्या ए४ वर इंग्रजीतून काही मिनिट्स टाईपिले होते. ना वर कोणा कंपनी, व्यक्तीचे नाव होते ना ही लोगो आणि खाली ना कुणाची सही वा पदनाम. लेटरहेड वाटावे वा कुणाला उद्धृत केलेले पत्र असावे, असे काही नामोनिशान नव्हते; मात्र मिनिट्समधील भाषा आणि मजकूर नजीकच्या भविष्यात काहीतरी मोठे घडविणारे होते.

भारतीय उद्योग आणि प्रसिद्ध उद्योगपतींच्या जीवनात भूकंप घडविणारे ते मिनिट्स होते. त्यात बातमी आहे, हे एव्हाना हेरले होते. पण कॉर्पोरेट क्षेत्रात असे कळते, समजते बातम्या देता येत नाहीत. पण बातमी आणि साप खिशात ठेवू नये, हा पत्रकारितेतील अलिखित नियम. झाले, मग काय सोर्स टटोलले, ऑफ द रेकॉर्ड कळले आणि रिस्क घेतली.

रिलायन्स उद्योग समूहाची मे महिन्यात फाळणी! मथळा आणि संबंधित वृत्ताने गहजब केला. दहा दिवसांत ते खरेही ठरले. दरम्यान ना नोटीस ना खुलासा. कारण 'त्यांचे ठरले' होते. २००५ मध्ये धाकले - अनिल अंबानी यांनी स्वतंत्र उद्योग-संसार थाटला. दूरसंचार, निवडक वस्त्रोद्योगसह दूरसंचार, ऊर्जा तसेच संरक्षण, पायाभूत क्षेत्रासह नव्याने मुशाफिरी सुरू केली.

रिलायन्स विभाजनापूर्वीचा थोरले बंधू मुकेश अंबानी यांचे स्वप्न असलेला दूरसंचार व्यवसाय डीएकेसीत (नवी मुंबई) सजला होता. 'कर लो दुनिया मुठ्ठी में' म्हणत ५०० रुपयांच्या सीडीएमए तंत्रज्ञानावरील मोबाईल फोनने देशातील दूरसंचार क्षेत्र ढवळून निघाले होते आणि विभाजनात नेमका हाच व्यवसाय अनिल यांच्याकडे आला (की घेतला गेला?)

रिलायन्स-अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचा त्यांनी विस्तार करण्यास सुरुवात केली; मात्र येथेच घात झाला. दूरसंचारच्या नेटवर्क गतीप्रमाणे अनिल अंबानी यांनी या व्यवसायात अब्जावधी डाॅलर ओतले. देशी-विदेशी भागीदारी-व्यवहार केले. देशातील दूरसंचार व्यवसायातील स्पर्धा शिगेला गेली.

टाटाचे डोकोमो आणि ऑरेंज, यूनिनाॅर, एअरसेल असे तगडे विदेशी स्पर्धक या अस्वस्थ बाजारात हात धुवून घेण्यासाठी उतरले. शिवाय देशी बीएसएनएल, एमटीएनएलही होतेच. मोबाईलचा व्यवसाय रांगत नाही तोच अनिल अंबानी यांनी ऑप्टिकल फायबर, केबल इंटरनेटसारख्या जंजाळात पाय अडकवून घेतला आणि शेवटी तेच झाले. गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाल्याने रिलायन्स पॉवर स्पर्धक अदानीला विकावी लागली. राजकीय संबंधांमुळे रिलायन्स डिफेन्सलाही कमी निविदा मिळू लागल्या. मुंबईतील पहिल्या मेट्रोचा मान सोडला, तर रिलायन्स इन्फ्राही जम धरू शकली नाही. वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती हे व्यवसाय पत्नी-टीना अंबानी यांना जणू काही छंद म्हणून करू दिले.

रिलायन्स-एडीएजी स्थापनेच्या तीन वर्षांत जगातील ६वे श्रीमंत उद्योगपती आणि वार्षिक ४२ अब्ज डॉलरचा उद्योग अशी बिरुदे मिरविलेल्या अनिल अंबानींचे व्यवसाय दशकाच्या आतच खाली आले. समूहाच्या उत्तर प्रदेशमधील दादरी ऊर्जा प्रकल्पाला न्यायालयाचा झटका बसला. तर दूरसंचारमध्ये एरिक्सनने कंपनीला कायद्याच्या कचाट्यात ओढले. गेल्या काही वर्षांमध्ये अनिल अंबानी हे विस्मृतीत गेले. कधी पुतण्याच्या लग्नात, तर कधी राखी पाैर्णिमेला बहिणींबरोबर असे क्वचितच ते दिसत. गेल्या काही दिवसांत ते पुन्हा चर्चेत आले. नव्या व्यवसायासाठी बाशिंग बांधण्याची तयारी म्हणा किंवा कंपनीचा नागपूरचा ऊर्जा प्रकल्प अदानीला विकण्याकरिता. वा आठवड्यापूर्वीच्या शेअर बाजारातील व्यवहारातील बंदीने.

रिलायन्स इंडस्ट्रिजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या व्यवसायात ८०च्या दशकात दाखल झालेले अनिल मोठ्या भावाबरोबर व्यवस्थित वाटचाल करत होते. उपव्यवसायाची जबाबदारी उभयतांनी सामंजस्याने वाटून घेतली होती; मात्र रिलायन्सलाही महाभारत चुकले नाही. अनिल वेगळे झाले. सुरुवातीला बरे चालले; मात्र कर्जवेगात व्यवसाय वेड्यात निघाले. कोरोनाच्या तोंडावर आपण दिवाळखोरीत गेल्याचे अनिल यांना तिकडे लंडनमध्ये जाहीर करावे लागले. कर्जाचे पैसे द्यायला आपल्याकडे काहीही नाही, असे सांगून मोकळे झाले. व्यवसाय विक्रीत थोडाफार आधार मोटा भाईने दिला. उरल्या सुरल्यांची नाममात्र मालकी राहिली. अशा त्यांच्या कंपन्यांचे शेअर बाजारातील सध्याचे अस्तित्वही नावापुरतेच आहे.

निवडक कंपन्यांच्या भांडवली बाजारात काही प्रमाणात हालचाली सुरू आहेत. परिणामी शेअर बाजारातील भांडवल खेळते राहत आहे; मात्र त्यातून गुंतवणूकदारांना फार मोठा फायदा वा परतावा मिळतोय, असे दिसत नाही. स्वत: अंबानी किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्यापेक्षा बँका, वित्त कंपन्या, म्युच्युअल फंड घराणेच उपकंपन्यांतील समभागांचे व्यवहार करताना दिसतात.

तर, अनिल अंबानी हे कर्जबुडवे झाले म्हणजे रस्त्यावर आले, असे नाही. त्यांचे दोन्ही पुत्र जय अनमोल आणि जय अंशुल हे उरलासुरला व्यवसाय हाताळत आहेत. टीना या पूर्णपणे गृहिणी (पहिल्यासारख्या) झालेल्या दिसतात. या उद्योगपतींचे आपल्यासारखे नाही. मुळात ते सोन्याचा चमचाच घेऊन जन्माला आलेले असतात. स्वत:कडे भांडवल असते. कर्ज देणारेही असतात. काॅन्टेक्ट, सोर्स, नेटवर्क वगैरे असतात. फक्त बॅड पॅच येत असतो. तुमच्या-आमच्यासारख्यांच्या आयुष्यात येतो तसा. पण अनिल यांचा बॅड पॅच संपण्याची चिन्हेच नाहीत. एक बरे, त्यांचे व्यवसाय, कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. कंपन्यांची उत्पादन, सेवाही थोडीफार दिसते. फक्त अनिल यांची कार्यकारी म्हणून भूमिका अल्प आहे. कदाचित शेअरच्या किमती, हिस्सा आणि लाभांशातून त्यांचे घर चालत असावे, असे नाही मात्र काहीतरी नक्कीच त्यांना मिळत असावे.

तरी प्रश्न उरतोच, अनिल सध्या नेमके करतात तरी काय..?

कायदेशीर आणि आर्थिक बाबींवर लक्ष

  • कायदेशीर लढाई : कर्ज आणि त्यांच्या कंपन्यांच्या दिवाळखोरी प्रक्रियेशी संबंधित व्यवहार अंबानी सध्या करत आहेत. उरलेल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि कंपन्यांच्या आर्थिक अडचणीतून होणारा परिणाम व्यवस्थापित करण्यासाठी त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे.

  • कर्ज तिढा निराकरण : रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ने केलेल्या कर्जांचे निराकरण करण्यावर अंबानी यांचा भर दिसत आहे. दिवाळखोरीची कार्यवाही सुरू असून कर्जदारांशी तडजोड करण्यासह थकित कर्जाच्या कायदेशीर परिणामांवर त्यांना काम करावे लागत आहे.

  • मालमत्ता विक्री आणि पुनर्रचना : कर्ज फेडण्यासाठी विविध मालमत्ता विकण्याचा पर्याय अंबानी यांच्यासमोर आहे. यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सचे स्पेक्ट्रम, टॉवर आणि इतर पायाभूत मालमत्तांची मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला विक्री सुरू आहे. निधी उभारण्यासाठी इतर व्यवसायातील भागभांडवल विक्रीकरिता चाचपणीही केली जात आहे.

  • पुनर्रचना व्यवसाय : नियंत्रणाखाली राहिलेल्या काही व्यवसायांवरील कर्ज कमी करण्यासाठी तसेच व्यवसाय स्थिर होण्यासाठी त्यांची पुनर्रचना केली जात आहे; मात्र या प्रयत्नांना पूर्वीच्या आर्थिक अडचणींमुळे मर्यादा येत आहेत. अंबानी यांची त्यातील एक्झिटही संथ आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत