‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील सुपरहिट हास्यकार्यक्रमाचं नवीन पर्व २६ जुलैपासून सुरू होत आहे. पण यंदा या कार्यक्रमात दोन मोठे बदल पहायला मिळणार आहेत. डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम हे दोघंही या सीझनमध्ये दिसणार नाहीत. गेली १० वर्षे “हसताय ना?... हसायलाच पाहिजे!” असं म्हणत हास्याच्या लाटांवर प्रेक्षकांना घेऊन जाणाऱ्या निलेशने एका मुलाखतीत स्पष्ट केलं की, तो सध्या एका मोठ्या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून त्यामुळे तारखा जुळल्या नाहीत. म्हणून तो या हास्ययात्रेचा भाग नसेल.
गेल्या काही आठवड्यांपासून, "निलेश साबळे शो सोडतोय?" आणि "त्याच जागी अभिजीत खांडकेकर येणार?" या चर्चांना ऊत आला होता. अखेर या चर्चांवर आज शिक्कामोर्तब झालं आहे. अभिजीत खांडकेकरने स्वतः प्रतिक्रिया देत हे सर्व स्पष्ट केलं आहे – “मला दडपण नाही, मी माझ्या पद्धतीनं सुरुवात करणार आहे.”
झी मराठीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोमधून करिअर सुरू करणाऱ्या अभिजीतसाठी हे प्लॅटफॉर्म कायमच विशेष राहिलंय. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’सारख्या लोकप्रिय कार्यक्रमाची सूत्रं हाती येणं, ही त्याच्यासाठी जबाबदारीची आणि आनंदाची गोष्ट आहे.
या पर्वाचं नाव आहे ‘कॉमेडीचं गॅंगवार’, ज्यात राज्यभरातून निवडलेले नवोदित हास्यकलाकार सहभागी होणार आहेत. श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे यांसारख्या जुन्या टीमसोबत अभिजीतचं आधीपासूनच मैत्रीपूर्ण नातं आहे.
“या कार्यक्रमाने १० वर्षांत प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळवलं, आणि तेच प्रेम नवीन स्वरूपातही मिळावं हीच अपेक्षा आहे,” असं म्हणत अभिजीतने नव्या पर्वासाठी शुभेच्छा मागितल्या आहेत.
‘चला हवा येऊ द्या - कॉमेडीचं गॅंगवार’ २६ जुलैपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.