मुंबई : 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या चित्रपटाचे प्रदर्शन रोखणाऱ्या एका न्यायाधीशांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते संजय सिंह यांनी यासंदर्भात अपील दाखल केले असून मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अपिलावर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानुसार अपिलावर १५ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या शीर्षकात करण जोहरचे नाव आणि व्यक्तिमत्त्व गुणांचा 'अनधिकृतपणे' वापर केला आहे. त्यामाध्यमातून प्रथमदर्शनी जोहरचे व्यक्तिमत्त्व अधिकार, प्रसिद्धी अधिकार आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण एकलपीठाने नोंदवले होते. त्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेल्या अपिलाची मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दखल घेतली. तसेच चित्रपटाचे सहनिर्माते संजय सिंह यांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली.