मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रिय 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे गेल्या आठवडाभरापासून थांबवण्यात चित्रीकरण आले आहे. बच्चन यांची प्रकृती ठीक नसल्याने निर्मात्यांनी नवीन भागांचे चित्रीकरण तात्पुरते स्थगित केले आहे.
'रामायण'च्या टीमसोबतचा भाग आधीच शूट
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे शोचे शूटिंग थांबले असले तरी चॅनेलकडून प्रेक्षकांसाठी जुन्या भागांचे पुनःप्रसारण केले जात आहे. दिवाळी विशेष आठवड्यानिमित्त काही आठवड्यांपूर्वी शूट केलेले सेलिब्रिटी स्पेशल भाग दाखवले जात आहेत. यामध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे यांचा समावेश आहे. हे तिघेही त्यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाले होते.
या भागाचे प्रसारण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आसपास करण्याचे नियोजन होते. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे हे नियोजन बदलावे लागले. त्यामुळे चॅनेलने दिवाळी विशेष आठवड्याची सुरुवातच 'रामायण'च्या टीमसोबतच्या भागाने केली.
पुढील आठवड्यापासून शूटिंग सुरू होण्याची शक्यता
माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची प्रकृती साथ देत असेल तर पुढील आठवड्यापासून 'कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग पुन्हा सुरू होऊ शकते. मात्र, त्यांच्या प्रकृतीनुसारच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नव्या भागांच्या चित्रीकरणासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.
ब्लॉगमधून व्यक्त केल्या भावना
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी शनिवारी त्यांच्या ब्लॉगमधून प्रकृती आणि पुन्हा कामाच्या दिनक्रमात परतण्याबाबत काही भावना व्यक्त केल्या. बऱ्याच काळानंतर नेहमीच्या कामाच्या वेळापत्रकात परतताना काही गोष्टी विसरल्यासारखे होते, असे त्यांनी लिहिले.
आपला चष्मा आणि मोबाईल कुठे ठेवला, पुढे काय काम करायचे होते, अशा छोट्या गोष्टीही कधी कधी आठवत नाहीत. मात्र, शाळेतील आठवणी आणि जुन्या गोष्टी सहज लक्षात राहतात, असे त्यांनी ब्लॉगमध्ये नमूद केले.
यासोबतच ब्लॉगवर नियमित संवाद साधणारे वाचक, दर रविवारी शुभेच्छा देणारे चाहते आणि 'कौन बनेगा करोडपती'च्या प्रेक्षकांबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चाहत्यांकडून मिळणारे प्रेम आणि आपुलकी आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी सर्वांसाठी प्रार्थना केली.