मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांनी अभिनेता सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागण्यास सांगितले आहे. अशा घटना थांबवायच्या असतील, तर सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागणं हाच एकमेव मार्ग असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सलमान खान आणि बिश्नोई समाजातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नेमकं काय म्हणाले अनुप जलोटा?
“या सर्व गोष्टी थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागणं. मी यापूर्वीही सांगितलं होतं की, बिश्नोई समाजाच्या दुखावलेल्या भावना तेव्हाच शांत होतील, जेव्हा सलमान खान त्यांची माफी मागेल,” असं अनुप जलोटा यांनी म्हटलं आहे.
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार
रविवारी (दि. १८) संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला होता. या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या काही व्यक्तींनी सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ संदेशांद्वारे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, या दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
टायगर नव्हताच मूळ लक्ष्य?
दरम्यान, आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आल्याचा दावा केला जात आहे. हल्लेखोर मुंबईत दुसऱ्या एका बड्या व्यक्तीच्या हत्येच्या उद्देशाने आले होते. मात्र, नियोजित लक्ष्यापर्यंत पोहोचता न आल्याने कथित सूत्रधारांच्या सूचनेवरून त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचं सांगितलं जात आहे.
आरोपींनी सोशल मीडियावरील टायगरच्या रील्स पाहून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्याचीही माहिती आहे. हल्लेखोरांना शस्त्रं कुठून मिळाली, त्यांना किती पैशांचं आश्वासन देण्यात आलं आणि हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचा पोलिस तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.