अभिनेता वरुण धवन सध्या आगामी युद्धपट 'बॉर्डर २' च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अशातच, त्याला बदनाम करण्यासाठी मोहीम सुरू असल्याचा खुलासा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. याशिवाय, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर थारा भाई जोगिंदर याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत वरुण धवनविरोधात सुरू असलेल्या कथित नकारात्मक मोहिमेचा पर्दाफाश केला आहे.
माहितीनुसार, या चित्रपटातील ‘घर कब आओगे’ हे गाणे आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासून वरुण धवनवर सोशल मीडियावर टीका आणि ट्रोलिंगचा मारा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 'बॉर्डर २' च्या निर्मात्या निधी दत्ता यांनी चित्रपटाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप केला असून, टीका करणाऱ्यांना त्यांनी ‘राष्ट्रविरोधी’ ठरवले आहे.
५ लाखांची ऑफर दिल्याचा खुलासा
व्हिडिओमध्ये जोगिंदर म्हणतो, “वरुण धवनची प्रतिमा खराब करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहिम चालवली जात आहे. काही लोक पैसे देऊन फक्त एवढेच बोलायला सांगत आहेत की वरुण धवनने फार वाईट अभिनय केला आहे.” यानंतर जोगिंदरला एका व्यक्तीचा कॉल येतो. या कॉलमध्ये संबंधित व्यक्तीने 'बॉर्डर २' ’मधील वरुण धवनच्या अभिनयाविरोधात व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी ₹५ लाखांची ऑफर दिल्याचा आरोप जोगिंदरने केला आहे.
भारतीय सैन्यावर आधारित चित्रपट
या ऑफरला जोरदार विरोध करत जोगिंदर म्हणाला की, 'बॉर्डर २' हा भारतीय सैन्यावर आधारित चित्रपट आहे आणि अशा चित्रपटाविरोधात नकारात्मक प्रचार करणे चुकीचे आहे. फोन कॉलदरम्यान संबंधित व्यक्तीने केलेल्या “फौजी तुम्हाला खायला-प्यायला देतो का?” या विधानावर संतप्त होत जोगिंदर म्हणतो, “तू हिंदुस्थानचा आहेस की पाकिस्तानचा? तुला अशी भाषा वापरताना लाज वाटत नाही का? मी तुझ्याविरोधात लगेच पोलीस तक्रार करीन."
दिग्दर्शक जसा रोल देतो, तसाच...
फोन कॉल संपल्यानंतर जोगिंदर वरुण धवनच्या बाजूने भूमिका घेत म्हणाला, “वरुण धवनने चित्रपटात काय चूक केली? दिग्दर्शक जसा रोल देतो, तसाच अभिनेता साकारतो. अशा प्रकारे कलाकाराला बदनाम करणे लाजिरवाणे आहे.”
या प्रकरणामुळे 'बॉर्डर २’ भोवतीचा वाद अधिक गडद झाला असून, सोशल मीडियावर यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. २३ जानेवारी २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, यात सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.