

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज १ महिना पूर्ण झाला. २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्र हळहळला. महिना उलटूनही त्यांच्या जाण्याची वेदना अजूनही ताजीच आहे. या निमित्ताने सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुनेत्रा पवार : "अजितदादा सदैव आपल्या स्मरणात"
सुनेत्रा पवार यांनी एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आणि आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्यशैलीची आठवण करून दिली.
"जिवाभावाचा माणूस… माणुसकीची खोल जाण, काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती, हेच अजितदादांचे खरे व्यक्तिमत्त्व होते. जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे विश्व होते,” असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, "स्वभावाने दिलदार आणि आपुलकीने माणसं जोडणारे, तर निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक आणि विकासाभिमुख नेतृत्व" अशी त्यांची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
"आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते; पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेले बळ आम्हाला पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील. अजितदादा सदैव आपल्या स्मरणात… आपल्या विचारांत, आपल्या कृतीत, आपल्या प्रत्येक कामात त्यांचे प्रतिबिंब कायम दिसत राहील," असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
रोहित पवार : “तो भारदस्त आवाज पुन्हा ऐकू आला नाही…"
रोहित पवार यांनीही भावनिक पोस्ट करत त्या दिवसाची आठवण सांगितली.
“जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही… खूप वेदनादायी..!” असे त्यांनी लिहिले.
युगेंद्र पवार : “काका, तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात…”
युगेंद्र पवार यांनी ‘प्रिय काका’ अशा शब्दांत भावनिक पत्र लिहिले.
"आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक महिना सर्वात जड आणि वेदनादायी ठरला,” असे ते म्हणाले.
“तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, ‘मी कामाचा माणूस आहे…’ असा भास होतो. पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जातं. आता तुमचं मार्गदर्शन कसं घेऊ?” असा सवाल त्यांनी केला.
आजींचे न थांबणारे अश्रू, वडिलांची भावनिक अवस्था आणि सभागृहात आता तुमचा आवाज घुमणार नाही, ही जाणीव त्यांनी शब्दबद्ध केली.
“काका, अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळत आहेत. नेमकं काय घडलं? सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असेही त्यांनी नमूद केले.
“तुम्ही सुरू केलेलं काम कधीही थांबू देणार नाही. तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल. तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल. Miss you Kaka,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
युगेंद्र पवारांची पोस्ट
सुप्रिया सुळे : “दादा, तुम्ही कायम स्मरणात…”
सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भावाच्या आठवणींना उजाळा दिला.
“आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठीण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील. Miss you Dada ,” असे त्यांनी लिहिले.
अजित पवार यांच्या निधनाला महिना पूर्ण झाला असला, तरी त्यांच्या आठवणी, त्यांचं काम आणि त्यांची उणीव - या भावना पवार कुटुंबीयांच्या शब्दांतून पुन्हा एकदा व्यक्त झाल्या आहेत.