बॉलीवूडचा किंग शाहरुख खानच्या बहुचर्चित 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी जवान या चित्रपटाच्या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सुमारे साडेतीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये किंग खानच्या अनेक संवादांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या ट्रेलरमधील अशाच एका डायलॉगची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे. या डायलॉगचं कनेक्शन नेटकरी थेट समीर वानखेडेंशी जोडत आहेत.
'जवान' च्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये शाहरुख खान 'मुलाला हात लावण्याआधी बापाशी बोल' असं म्हणताना दिसत आहे. यावर असंख्य नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच या डायलॉगची १२ सेकंदाची क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. युजर्सनी याचा संदर्भ थेट समीर वानखेडे यांच्याशी जोडला होता. याच पार्श्वभूमीवर आता स्वत: समीर वानखेडेंनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत शाहरुखचं नाव न घेता त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
समीर वानखेडेंनी ट्विटरवर निकोल लायन्स यांचा कोट शेअर केला आहे. "आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केल्यामुळे मला जराही भीती वाटत नाही." असा या कोटचा अर्थ आहे. ही पोस्ट समीर वानखेडे यांनी शाहरुखच्या व्हायरल होणाऱ्या डायलॉगमुळे शेअर केली असल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. समीर वानखेडेंनी ट्वीटमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यांनी फक्त कोट शेअर करत काही वृत्तवाहिन्यांना टॅग केलं आहे.
दरम्यान, समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ज्या वेळी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी किंग खानच्या 'जवान' चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. आर्यन खानला याप्रकरणात जवळसपास महिनाभर तुरुंगांत रहावं लागलं होतं.