दशमी : रावणदहन की रहस्याचा खेळ? 
मनोरंजन

दशमी : रावणदहन की रहस्याचा खेळ?

चित्रपटाचं नाव जरी ऐकलं, तरी मनात एक विशिष्ट उत्सुकता निर्माण होते. कारण ‘विजयादशमी’ हा सण आपण वाईटावर चांगल्याचा विजयोस्तव म्हणून साजरा करतो. पण जेव्हा हाच विषय एका कलाकृतीचा केंद्रबिंदू बनतो, तेव्हा ती कलाकृती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.

प्रतिनिधी

क्रांती गोडबोले-पाटील

चित्रपटाचं नाव जरी ऐकलं, तरी मनात एक विशिष्ट उत्सुकता निर्माण होते. कारण ‘विजयादशमी’ हा सण आपण वाईटावर चांगल्याचा विजयोस्तव म्हणून साजरा करतो. पण जेव्हा हाच विषय एका कलाकृतीचा केंद्रबिंदू बनतो, तेव्हा ती कलाकृती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. अशीच वेगळ्या वाटेवर जाणारी कलाकृती आपल्या भेटीला येत आहे, ती म्हणजे ‘दशमी’ हा सिनेमा! या चित्रपटाची स्टार कास्ट ‘फ्री-प्रेस’-’नवशक्ति’च्या कार्यालयात दाखल झाली होती. या गप्पांमध्ये सिनेमाच्या पडद्यामागच्या गोष्टींपासून ते कलाकारांच्या वैयक्तिक अनुभवांपर्यंत अनेक रंजक पैलू समोर आले. मराठी चित्रसृष्टीत तसा ‘इन्टेन्स सस्पेन्स- थ्रिलर’ हा जॉनर अभावानेच पाहायला मिळतो. योगेश पांडुरंग भोसले या तरुण दिग्दर्शकाने अत्यंत जिद्दीने या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. एरवी विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे या सिनेमात एका अत्यंत गंभीर आणि वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत. त्याविषयी बोलताना ते म्हणतात की, “अशा पद्धतीचे सिनेमे आपल्या वाट्याला मुळात कमी येतात. विनोदी सिनेमा म्हटलं की पटकन हो म्हटलं जातं आणि ते मी वर्षानुवर्षे करतोही. पण काहीतरी वेगळं करायला मिळतंय, या भावनेतून मी हा सिनेमा स्वीकारला.” या सिनेमात ते गौरी इंगवलेच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत, जिथे नात्यांचे अनेक पदर उलगडताना दिसणार आहेत.

या चित्रपटाची नायिका म्हणजेच गौरी इंगवले हिच्यासाठी हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याविषयी बोलताना मकरंद अनासपुरे कौतुकाने सांगतात की, ही एक नायिकाप्रधान गोष्ट आहे आणि हा सिनेमा तिच्या कारकीर्दीला एक फार पुढचं वळण देणारा ठरेल याची मला खात्री आहे. गौरी या भूमिकेबद्दल सांगते की, “जेव्हा ही कथा ऐकली, तेव्हाच हा सिनेमा करावासा वाटला. यात माझं खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे. एक इनोसेंट मेडिकल स्टुडंट ते एका वेगळ्या प्रवासापर्यंतच्या अनेक शेड्स यात पाहायला मिळतील. मकरंद सर आणि विजय निकम सर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करताना प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शिकायला मिळालं.”

या चित्रपटाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे साऊथ सिनेमांचे प्रसिद्ध अभिनेते रवी प्रकाश यांनी यात केलेली महत्त्वाची भूमिका. पहिल्यांदाच मराठी भाषेत काम करण्याचा अनुभव कसा होता, यावर ते मनमोकळेपणाने बोलले. त्यांनी सांगितलं की, “भाषेचा थोडासा चॅलेंज होता, पण दिग्दर्शक योगेश भोसले आणि संपूर्ण टीमने स्क्रीप्टचं वाचन इतक्या वेळा करून घेतलं की तो बॅरियर कधी जाणवलाच नाही. मराठी सिनेसृष्टीतील लेखनाचे उच्च निकष आणि मानवी भावनांची अतिशय सुंदर मांडणी यांमुळे मी या प्रोजेक्टसाठी क्षणात होकार दिला.”

साऊथ आणि मराठी सिनेसृष्टीची तुलना करताना त्यांनी स्पष्ट केलं की, बजेट आणि रिसोर्सेसचा प्रश्न असला, तरी या सिनेमाच्या गुणवत्तेशी कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही.

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते विजय निकम यांनीही या सिनेमातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना दिग्दर्शक आणि लेखकाचे कौतुक केले. ते म्हणाले की, प्रत्येक वेळी वेगळं दिसण्याचं आणि वागण्याचं श्रेय लेखक-दिग्दर्शकाला जातं. आमची सगळी पात्रं ही थोडी ‘ग्रे शेड्स’ असलेली आहेत. सस्पेन्स सिनेमा असल्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला ताणत ठेवण्यात खरी मजा आहे. यावेळी गप्पा मारताना कलाकारांनी केवळ सिनेमापुरतं मर्यादित न राहता जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही, असं सांगताना मकरंद अनासपुरे यांनी आजच्या जेन-झेड पिढीचं कौतुक केलं. “आजच्या पिढीकडे अधिक स्पष्टता आहे, ते उघडपणे चांगलं ते चांगलं आणि वाईट ते वाईट बोलतात, असं त्यांनी नमूद केलं.” तसेच, पूर्वीच्या मध्यमवर्गीय कुटुंबांमधील संघर्ष आणि आजच्या पालकांचा बदललेला दृष्टिकोन यावरही त्यांनी दिलखुलास संवाद साधला.

सिनेमाची टॅगलाइन आहे- ‘रावण दहन दसऱ्यालाच’. मग या चित्रपटातील रावण नेमकं कोण? व्यक्ती, प्रवृत्ती की व्यवस्था? यावर मकरंद अनासपुरे अत्यंत समर्पक उत्तर देतात की, रावण ही एक वृत्ती आहे, जी आपल्यामध्येही असू शकते आणि बाहेर समाजातही असू शकते. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये एक रावण असतो आणि त्याचं दहन करणं हीच खरी महत्त्वाची गोष्ट आहे. या सिनेमात अनेक ज्वलंत प्रश्नांना हात घालण्यात आला आहे आणि व्यवस्थापनाला, माणसातील रावणाला प्रश्न विचारण्यात आले आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १६ ऑक्टोबर रोजी जवळच्या चित्रपटगृहात येत आहे. एका संवेदनशील विषयावर आणि तशाच जबरदस्त सस्पेन्सवर आधारित असलेला हा चित्रपट मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार यात शंका नाही. तेव्हा सहकुटुंब, सहपरिवार नक्की पाहा- ‘दशमी’!

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश

Mumbai : मध्यान्ह भोजनाच्या दर्जावरून स्थायी समितीत खडाजंगी; काळ्या यादीतील संस्थांना पुन्हा काम देण्यास सदस्यांचा आक्षेप

Thane : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासाला वेग; दोन दुचाकी जप्त, संशयितांची चौकशी सुरू, CBI चौकशी मागणी

Mumbai : ...तर रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ अटळ; एप्रिलपासून CNG किलोमागे ८ रुपयांनी वाढ