काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित 'गुलकंद'मधील 'चंचल' हे गोड प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. 'चंचल' गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीनंतर चित्रपटातील दुसरं गाणं 'चल जाऊ डेटवर' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे.
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, "या गाण्यातील सई, समीर आणि प्रसाद, ईशा यांची केमिस्ट्री मजेशीर असून प्रेक्षकांना हसवणारी आहे. गाण्याचे बोल, संगीत सगळंच खूप छान आहे. एक वेगळाच मूड बनवणारं हे गाणं असल्यानं त्याचं चित्रीकरण तसंच होणं गरजेचं होतं. मस्त कलरफुल ठिकाणी चित्रित करण्यात आलेलं हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल. गाण्यात सई -समीर जरी डेटवर जात असल्याचे दिसत असले तरी १ मे रोजी सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह ही डेट एन्जॉय करावी.’’
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, " चित्रपट यशस्वी करण्यात गाण्यांचा मोठा सहभाग असतो. कधी कधी कथेतून जी गोष्ट, भावना मांडता येत नाहीत त्या गाण्यातून मांडता येतात. असंच हे गंमतीशीर गाणं आहे. हे या चित्रपटातील दुसरं गाणं आहे. पहिले गाणं रोमँटिक होते, हे गाणं अतिशय एनर्जेटिक असून प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. चित्रपट पाहातानाही प्रेक्षक हे गाणं अतिशय एन्जॉय करतील.''
या दिवशी प्रदर्शित होणार 'गुलकंद'
गाण्यात सई आणि समीरची भन्नाट केमिस्ट्री दिसत असून समीर आणि सईचे नृत्य एक सरप्राईज आहे. सई समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार आणि तिथे काय धमाल होणार, याची उकल १ मे २०२५ ला गुलकंद प्रदर्शित झाल्यावर होणार आहे.