मुंबई : प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी विभक्त पत्ती रिटा भट्टाचार्यविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. रिटाने अलीकडेच दिलेल्या काही मुलाखतींमुळे प्रतिमेला हानी पोहोचल्याचा आरोप करत कुमार सानूंनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याद्वारे ३० लाख रुपयांची मागणी केल्याचे आधी समोर आले होते, मात्र प्रत्यक्षात कुमार सानू यांनी ३० लाख नव्हे ५० कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा रिटा यांनी केला आहे.
‘₹५० कोटी? मला धक्का बसला’
रिटा यांनी अलीकडेच Bombay Times शी बोलताना सांगितले, “मला पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये ₹५० कोटींची मागणी आहे. माझ्याकडे एवढे पैसे आहेत, असा विचार कुमार सानू कसा करू शकतो, हेच कळत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे.” कुमार सानूंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का, असे विचारले असता रिटाने सांगितले की, “त्यांनी अनेक वर्षांपासून मला आणि मुलांनाही ब्लॉक केले आहे. माझ्याशी किंवा मुलांशी कोणाशीच ते बोलत नाहीत.”
‘हा मोठा अपमान आहे’
“मी त्यांच्या सेक्रेटरीशी संपर्क साधून हे थांबवण्याची विनंती केली. हा माझ्यासाठी फार मोठा अपमान आहे. माझ्या मुलाचं लग्न ठरत होतं आणि सासरच्या मंडळींकडून प्रश्न विचारले जात होते. मी अनेक वेळा विनंती केली. माझ्या मोबाईलमध्ये सर्व संदेश आणि रेकॉर्डिंग्ज आहेत,” अशी आठवणही रिटाने सांगितली.
‘३१ वर्षांनंतर कोर्टात भेट होईल’
रिटाने पुढे म्हटलं, “माझी मुले लहान नाहीत. मोठा मुलगा ३७, दुसरा ३४ आणि जान ३१ वर्षांचा आहे. लोकांना उत्तर देणे हा त्यांचा गुन्हा आहे असे मला वाटत नाही, कारण त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. मी आता ६३ वर्षांची आहे आणि पुन्हा कोर्टात लढावं लागणार आहे. पहिल्यांदा ते मला कोर्टात घेऊन गेले तेव्हा मी गरोदर होते...जान माझ्या पोटात होता. आता पुन्हा…३१ वर्षांनंतर आम्ही कोर्टात भेटू.” अखेरीस त्या म्हणाल्या, “मी हात जोडून एकच विनंती करेन, किमान चांगला माणूस बनण्याचा तरी प्रयत्न कर आणि माझ्या तीन मुलांचा पिता म्हणून वाग. आमच्यावर प्रेम जमत नसेल, तर किमान आम्हाला त्रास तरी देऊ नकोस.”
रिटा आणि कुमार सानू यांचा विवाह १९८६ मध्ये झाला आणि सात वर्षांनंतर ते वेगळे झाले. २००१ मध्ये त्यांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला.