अमिताभ बच्चन, संग्रहित छायाचित्र Tumblr/ @srbachchan
मनोरंजन

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे शेजारी-शेजारी असलेले दोन आलिशान फ्लॅट्स एकूण १२ कोटी रुपयांना विकले आहेत. त्यांनी हे फ्लॅट्स २०१२ साली खरेदी केले होते.

Krantee V. Kale

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे शेजारी-शेजारी असलेले दोन आलिशान फ्लॅट्स एकूण १२ कोटी रुपयांना विकले आहेत. मालमत्ता नोंदणी दस्तऐवजांनुसार (CRE Matrix), बच्चन यांनी हे फ्लॅट्स २०१२ साली ८.१२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यामुळे या दोन फ्लॅट्सच्या विक्रीतून त्यांना १३ वर्षांत सुमारे ४७ टक्के नफा झालाय.

कोणते फ्लॅट्स विकले?

बच्चन यांनी विकलेले दोन्ही फ्लॅट्स गोरेगाव (पूर्व) येथील ‘ओबेरॉय एक्सक्विझिट’ (Oberoi Exquisite) इमारतीच्या ४७व्या मजल्यावर आहेत. नोंदीनुसार, पहिला फ्लॅट (१,८२० चौ. फूट) आशा ईश्वर शुक्ला यांना ६ कोटी रुपयांना विकण्यात आला. या व्यवहारात ३० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांची नोंदणी फी समाविष्ट होती. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याची अधिकृत नोंदणी झाली. दुसरा फ्लॅटही तितक्याच आकाराचा असून (१,८२० चौ. फूट), तो ममता सुरजदेव शुक्ला यांना ₹६ कोटींना विकण्यात आला आहे. या व्यवहारासाठीही समान मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आकारण्यात आली. दुसऱ्या फ्लॅटची नोंदणी १ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली. नोंदणी कागदपत्रांनुसार, या दोन फ्लॅट्ससाठी एकूण चार कार पार्किंगची सोय उपलब्ध आहे.

अलिबागमध्येही मोठी गुंतवणूक

गेल्या काही वर्षांपासून अमिताभ बच्चन रिअल इस्टेट क्षेत्रात खरेदी आणि गुंतवणूकीत सक्रिय आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांनी ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL)’ प्रकल्पाच्या फेज २ मध्ये अलिबाग येथे सुमारे ₹६.६० कोटींच्या तीन प्रमुख जमिनींची खरेदी केली. याआधीही, एप्रिल २०२४ मध्ये बच्चन यांनी अलिबागमध्येच १०,००० चौ. फूट जमीन ₹१० कोटींना विकत घेतली होती.

अयोध्येतही गुंतवणूक आणि स्मारकाचा विचार

मुंबई आणि अलिबाग व्यतिरिक्त, अमिताभ बच्चन यांनी अयोध्या शहरातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनापूर्वी त्यांनी ५,३७२ चौ. फूट क्षेत्रफळाचा प्लॉट विकत घेतला होता. याशिवाय, त्यांच्या वडिलांचे नाव असलेल्या हरिवंश राय बच्चन ट्रस्टच्या नावावर ५४,००० चौ. फूटाचा भूखंड असून, त्याठिकाणी स्मारक उभारण्याचा त्यांचा मानस असल्याचे समजते.

आगामी चित्रपट कोणते?

८२ वर्षीय अमिताभ बच्चन लवकरच ‘सेक्शन ८४’ या चित्रपटात निमरत कौर, डायना पेंटी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत दिसणार आहेत. याशिवाय ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘कल्कि २८९८ एडी’ या चित्रपटांच्या दुसऱ्या भागातही ते झळकतील. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती १७’ या लोकप्रिय शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार

वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ न्यायालयात; सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश; सुनावणी आता १३ नोव्हेंबरला