ज्या रंगांपासून ती दूर राहायची, त्याच रंगांनी तिची कायमची ओळख घडवली… मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत हिच्या ‘कलरफुल’ या नावामागची गोष्ट सध्या चर्चेत आली आहे. अलीकडेच ‘नवशक्ति’शी संवाद साधताना पूजाने तिच्या करिअरमधील महत्त्वाच्या टप्प्यांबरोबरच ‘कलरफुल’ या नावामागचा भन्नाट किस्सा सांगितला.
'दगडी चाळ' ठरला करिअरचा टर्निंग पॉइंट
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या दगडी चाळ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, कमलेश सावंत यांच्यासोबत पूजाची भूमिका विशेष गाजली. विशेषतः अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती.
पूजा सांगते, "पोस्टर बॉयज चित्रपटातील माझं काम पाहून अंकुश सरांनी मला दगडी चाळसाठी विचारलं. हा चित्रपट माझ्या करिअरचा माइलस्टोन ठरला."
‘कलरफुल’ नावामागची गोष्ट
ती पुढे म्हणते, "मी या नावाचं श्रेय अंकुश सर, दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर आणि प्रेक्षकांना देते. त्यांनी मला ‘कलरफुल’ हे नाव दिलं, पण महाराष्ट्राच्या जनतेने ते इतकं मोठं केलं की आज लोक मला त्या नावानेच ओळखतात. कदाचित कुणाला माझं खरं नाव माहिती नसेल, पण ‘कलरफुल’ म्हटलं की सगळे ओळखतात. मला आयुष्यभर या नावानेच ओळखलं जावं असंच वाटतं."
कलरफुल आवडत नव्हती रंगपंचमी
या नावामागे एक मजेशीर किस्सा आहे. पूजा सांगते, "मी याआधी कधीच रंगपंचमी खेळली नव्हती. कोणीतरी येऊन चेहऱ्यावर रंग लावणं मला अजिबात आवडत नव्हतं.” शूटिंगच्या दिवशीही तिने अंकुश चौधरी यांना स्पष्ट सांगितलं होतं - "सर, थोडा कमी रंग लावा… मला आवडत नाही."
एका सीनमध्ये सगळं बदललं
मात्र, सीनदरम्यान तिच्यावर रंग उधळले गेले आणि त्याच क्षणी ‘कलरफुल’ हे नाव सुचलं. स्क्रिप्टमध्ये आधी हे नाव नव्हतं. त्या क्षणीच सीनमध्ये बदल करून सूर्या तिच्याकडे पाहत "ए कलरफुल… छान दिसतेस" असा डायलॉग करण्यात आला आणि तिथूनच या नावाचा जन्म झाला, असं ती म्हणाली.
त्या दिवसानंतर मात्र पूजाने रंगपंचमी एन्जॉय करायला सुरुवात केली. एका छोट्याशा सीनमधून मिळालेलं हे नाव तिच्या संपूर्ण करिअरची ओळख बनलं.
नवे प्रोजेक्ट्स; चाहत्यांची उत्सुकता वाढली
दरम्यान, पूजाचे अलीकडील आणि आगामी प्रोजेक्ट्सही चर्चेत आहेत. नुकतीच ती सखे ग साजणी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये अभिजीत खांडकेकर आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासोबत तिची भूमिका पाहायला मिळाली.
याशिवाय, ती लवकरच सालबर्डी या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच कप बशी या चित्रपटातही ती झळकणार असून, तिच्या या नव्या भूमिकांकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
एका सीनमधून मिळालेलं ‘कलरफुल’ हे नाव आज तिची ओळख बनलं आहे… आणि पूजाच्या करिअरप्रमाणेच ही गोष्टही तितकीच रंगतदार ठरली आहे.