'बिग बॉस मराठी ६'च्या घरात पहिल्याच आठवड्यापासून राडा सुरू झाला आहे. सुरुवातीला किरकोळ मतभेद वाटणारे मुद्दे आता थेट वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचले आहेत. राकेश बापटवर संमतीशिवाय हात लावल्याचा आरोप अनुश्री मानेने केल्यापासून 'बिग बॉस मराठी'च्या घरातील वातावरण कमालीचं तापलं आहे. घरातला वाद बाहेर येताच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी या मुद्द्यावर उघडपणे राकेशची बाजू घेत आहेत. त्यातच आता राकेश बापटच्या बहिणीने या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
राकेश आणि अनुश्री यांच्यातील वादाला सुरुवात कशी झाली?
या संपूर्ण वादाची सुरुवात झोपेच्या जागेवरून झाली. अनुश्री राकेशच्या बेडवर जाऊन झोपली होती. त्यावेळी प्रकृती ठीक नसल्यामुळे राकेश तिला, "तू इथून उठ आणि दुसरीकडे जाऊन झोप," अशी विनंती करत होता. त्याने आधी प्राजक्ता शुक्रे, दीपाली सय्यद आणि तन्वी कोलते यांना अनुश्रीला उठवून तिच्या जागेवर पाठवण्यास सांगितलं होतं. पण, 'झोपेत' असल्यामुळे अनुश्री ऐकायला तयार नव्हती. म्हणून नंतर राकेश स्वतः तिला उठवायला पुढे आला. मात्र, अनुश्रीने शेवटपर्यंत आपला हट्ट सोडला नाही. अखेर घरातील इतर सदस्यांनी झोपायच्या जागांमध्ये बदल करत ते प्रकरण तिथेच मिटवले. मात्र, या वादाला अधिक गंभीर वळण मिळालं ते दुसऱ्या दिवशी. करण सोनावणेला 'पॉवर-की'चा हक्क प्राजक्तामुळे गमवावा लागल्यानंतर रुचिता करणची उणीदुणी काढत होती. बराच वेळ तिची बडबड सुरू असल्यामुळे अखेर 'कोणीतरी हिला थांबवा' असे राकेश इंग्रजीत पुटपुटला. ते ऐकल्याने रुचिता भडकली आणि रात्रीचा मुद्दा उकरून काढला. यावेळी तिने राकेशवर अनुश्रीला तिच्या संमतीशिवाय हात लावल्याचा आरोप केला. त्यामुळे वातावरण चिघळलं. नंतर अनुश्रीने स्वतःही याच आरोपाच पुनरुच्चार केला आणि 'मला परवानगीशिवाय कोणीही हात लावू शकत नाही' असं सुनावलं. त्यामुळे राकेश प्रचंड दुखावला गेल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. त्यानंतर त्याने अनुश्री आणि रुचिताशी बोलणंही टाळल्याचं पाहायला मिळालं.
या संपूर्ण प्रकरणात घरातील काही सदस्यांनी अनुश्रीची थेट कानउघडणी केली. सागर कारंडे, दीपाली सय्यद आणि आयुष संजीव यांनी अनुश्रीला तिच्या वागणुकीबाबत स्पष्ट शब्दांत सुनावल्याचं पाहायला मिळालं.
कलाकारांचा थेट पाठिंबा
घरातला वाद बाहेर येताच सोशल मीडियावर राकेशच्या समर्थनार्थ अनेक प्रतिक्रिया उमटल्या. राकेश बापटच्या पाठिंब्यासाठी #WeSupportRaqeshBapat हा हॅशटॅग जोरात ट्रेंड होऊ लागला आहे. राकेशचे चाहतेच नाही, तर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारही उघडपणे त्याच्या बाजूने उभे राहिले आहेत. बिग बॉस सीजन ३ मधील स्पर्धक अभिनेत्री सोनाली पाटीलने या प्रकरणावर सविस्तर व्हिडीओ शेअर करत, "या सगळ्यावर आता रितेश भाऊंनी अनुश्रीला चांगलाच जाब विचारला पाहिजे," अशी मागणी केली आहे. 'बिग बॉस मराठी'’च्या दुसऱ्या पर्वाची उपविजेती नेहा शितोळेनेही पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. नेहाने लिहिलं, "राकेश बापट… या प्रकरणात मी तुझ्यासोबत आहे. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. या मुली अतिशय वाईट पद्धतीने हा खेळ खेळत आहेत. एक स्त्री म्हणून मी तुझी माफी मागते… हे अजिबातच योग्य नाही. RB खरंच जंटलमन आहे." अभिनेत्री रुपाली भोसलेनेही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत अनुश्री आणि रुचिताला खडेबोल सुनावले. राकेशला पाठिंबा देत तिने सागर कारंडेचंही कौतुक केलं आहे.
राकेशच्या बहिण म्हणते- "मला खात्री आहे की माझा भाऊ...
या सगळ्यावर राकेशची बहीण शीतल बापट हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्राम स्टोरी ठेवून तिने,"वुमन कार्डचा गैरवापर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशा प्रकारांमुळे खऱ्या पीडित महिलांकडेही दुर्लक्ष केलं जातं आणि महिलांबद्दल चुकीची प्रतिमा तयार होते. खऱ्या अर्थाने सक्षम महिला कधीही याचा (वुमन कार्ड) वापर करत नाही. या प्रकारामुळे फरक पडत नाही, कारण, मला खात्री आहे की माझा भाऊ राकेश बापट याबाबतीत कधीही चुकीचा वागू शकत नाही, असे तिने ठामपणे म्हटले.
आजच्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
दरम्यान, आज प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा एकदा जोरदार जुंपल्याचं दिसत आहे. राकेश वारंवार अनुश्रीला गप्प राहण्यास सांगत असताना अनुश्रीही त्याला तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे आज रात्री नेमकं काय घडणार आणि आठवड्याच्या शेवटी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यावर काय भूमिका घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.