म्हैसूर (कर्नाटक) : दिग्गज पार्श्वगायिका एस. जानकी यांच्यावर रविवारी संध्याकाळी येथील कानियानहुंडी फार्म हाऊसवर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात श्वसनाच्या त्रासामुळे त्यांचे निधन झाले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जाहीर केल्यानुसार, राष्ट्रगीताच्या धूनमध्ये पोलीस पथकाने त्यांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.
जानकी यांची नात अप्सरा वैद्यूला हिने वैदिक मंत्रोच्चारांच्या घोषात आजीच्या चितेला अग्नी देऊन अंत्यविधी पार पाडले.
करियानहुंडी येथे नेण्यापूर्वी, जानकी यांचे पार्थिव महाराजा कॉलेज मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे कन्नड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, पार्श्वगायक आणि हजारो सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री शिवकुमार यांनी बेंगळुरू येथे सांगितले की, त्यांचे सरकार जानकी यांचा वारसा अजरामर करण्यासाठी प्रयत्न करेल. दिग्गज पार्श्वगायिका जानकी आता आपल्यात नाहीत. त्यांनी जवळपास ५० वर्षे सर्व भाषांमधील आपल्या चित्रपटसृष्टीची सेवा केली.’