सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. फ्री प्रेस जर्नलने याविषयी माहिती दिली आहे. फ्री प्रेसच्या माहितीनुसार, संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष हल्लेखोर आरोपी हाच आहे का किंवा या गुन्ह्याशी त्याचा काही संबंध आहे का याची कोणतीही स्पष्ट माहिती मुंबई पोलिसांनी अद्याप तरी दिलेली नाही किंवा तशी अधिकृत घोषणा केलेली नाही.
सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली. वांद्रे येथील उच्चभ्रू वसाहतीमधील ‘सत्गुरू शरण’ या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील सैफ अली खानच्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने सपासप सहा वार केले. या हल्ल्यात सैफच्या मानेवर आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिमने मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
अद्याप कोणालाही अटक नाही
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लखोराचा माग काढून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी ३० पथके स्थापन केली आहेत. सध्या या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप तरी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सैफला २-३ दिवसांत घरी पाठविणार
सैफ अली खानच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून त्याला दोन-तीन दिवसांत रुग्णालयातून घरी पाठविण्यात येण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. सैफ उपचारांना प्रतिसाद देत असून त्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे, आम्ही त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे, कदाचित त्याला दोन-तीन दिवसांत घरी पाठविण्यात येईल, असे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले. डॉक्टरांच्या पथकाने सैफ याची तपासणी करून त्याला चालण्यास सांगितले. तेव्हा तो आरामात चालत होता, असेही डॉक्टर म्हणाले.