Instagram/paudwal.anuradha_official
मनोरंजन

Anuradha Paudwal: अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

आपल्या सुमधुर आवाजाने नेहमीच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

Swapnil S

मुंबई : आपल्या सुमधुर आवाजाने नेहमीच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांसहित १२ राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

संगीत आणि गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४चा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे, तर शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा २०२४ चा ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०२४ साठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुद्धीसागर यांची निवड झाली आहे.

‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४’चा पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल २०२४चा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३’साठी शशिकला झुंबर सुक्रे यांची, तर २०२४ साठी जनार्दन वायदंडे यांची निवड झाली आहे.

पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुपटीने वाढ करण्यात आली आहे. पूर्वी पाच लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. आता ते १० लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे झाले आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे. पूर्वी एक लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. आता या पुरस्कार विजेत्यांना तीन लाख रोख, मानपत्र व मानचिन्ह असा पुरस्कार मिळणार आहे.

यांनाही पुरस्कार जाहीर

  • विशाखा सुभेदार (नाटक)

  • डॉ. विकास कशाळकर (उपशास्त्रीय संगीत)

  • सुदेश भोसले (कंठसंगीत)

  • अभिमन्यू धर्माजी सावदेकर (लोककला)

  • शाहीर राजेंद्र कांबळे (शाहिरी)

  • सोनिया परचुरे (नृत्य)

  • रोहिणी हट्टंगडी (चित्रपट)

  • संजयनाना धोंडगे (कीर्तन, प्रबोधन)

  • पांडुरंग मुखडे (वाद्यसंगीत)

  • नागेश सुर्वे (कलादान)

  • कैलास मारुती सावंत (सांस्कृतिक)

  • शिवराम शंकर धुटे (आदिवासी गिरीजन)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी