मुंबई : सिनेअभिनेता सलमान खानला खंडणीसाठी येणाऱ्या धमक्यांच्या मेसेजचे सत्र सुरूच असून गुरुवारी रात्री पुन्हा सलमानला एका मेसेजद्वारे पाच कोटीसाठी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेचे अधिकारी समांतर तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सलमानला सतत अज्ञात व्यक्तीकडून खंडणीसाठी धमकी येत आहे. संबंधित व्यक्तीकडून बिष्णोई टोळीच्या नावाचा वापर करून ही धमकी दिली जात आहे. चालू महिन्यात पाच ते सहा गुन्ह्यांची पोलिसांनी नोंद करून काही संशयित आरोपींना अटक केली होती. तरीही सलमानला धमकीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर सलमानच्या नावाने आणखी एक मेसेज पाठविण्यात आला होता. त्यात अज्ञात व्यक्तीने तो बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करून सलमानकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाही तर त्याचा गेम करू अशी धमकी दिली होती. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू आहे. यातील बहुतांश धमक्या वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झाल्या आहेत.