मनोरंजन

आई-मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा 'तिघी'चा ट्रेलर प्रदर्शित

‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही टॅगलाईन ट्रेलरमध्ये ठळकपणे जाणवते. घर हे केवळ चार भिंतींचं नसून आठवणी, तुटलेले संवाद आणि पुन्हा जुळणारे धागे यांचं प्रतीक असल्याचा संदेश यातून दिला जातो.

Krantee V. Kale

आई–मुलींचं नातं शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याचं, कधी मतभेदांनी दुरावलेलं; तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. या गुंतागुंतीच्या आणि भावनिक नात्याचा वेध घेणाऱ्या आगामी मराठी चित्रपट 'तिघी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

अवघ्या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एका घरातल्या तीन स्त्रियांचं आयुष्य ठळकपणे उलगडताना दिसतं. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील मतभेद, छोट्या-मोठ्या भांडणांतून व्यक्त होणारा राग, न बोललेल्या अपेक्षा आणि तरीही जाणवणारा जिव्हाळा याचं वास्तववादी चित्रण यात पाहायला मिळतं. आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर या तिघी एकमेकींसाठी कशा उभ्या राहतात, याची उत्सुकता ट्रेलर शेवटपर्यंत टिकवून ठेवतो.

ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासाठी खास सरप्राईजचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या निकटवर्तीयांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. गायिका प्रियंका बर्वे आणि शरयू दाते यांनी चित्रपटातील गाणी सादर केली. यावेळी नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, जीजिविषा काळे, जितेंद्र जोशी, शरयू दाते, प्रियंका बर्वे, निलेश मोहरीर, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि गिरिजा ओक यांसह चित्रपटाची टीम उपस्थित होती.

‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही टॅगलाईन ट्रेलरमध्ये ठळकपणे जाणवते. घर हे केवळ चार भिंतींचं नसून आठवणी, तुटलेले संवाद आणि पुन्हा जुळणारे धागे यांचं प्रतीक असल्याचा संदेश यातून दिला जातो.

दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणाल्या, "आई आणि मुलींचं नातं अनेक थरांनी बनलेलं असतं. कधी ते भांडणांतून व्यक्त होतं, कधी शांततेतून. ‘तिघी’मधून आम्ही या नात्याची प्रामाणिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला यात स्वतःचं घर आणि नातं दिसेल.”

ट्रेलर पाहा

चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

आई–मुलींच्या नात्याकडे संवेदनशील आणि प्रगल्भ दृष्टीकोनातून पाहणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मुंबईतील विहिरींना पावसाची ओढ; एक हजार विहिरींची युद्धपातळीवर साफसफाई, पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी उपलब्ध करणार

छ. संभाजीनगर : जिल्हा बँकेच्या राजकारणात आता भाजपची एन्ट्री; शिरसाटांविरोधात सत्तारांचा बंडखोर सूर, अतुल सावेंचा अर्ज दाखल

मुंबईला मिळणार पहिला ‘पादचारी झोन’; काळा घोडा परिसर पर्यटकांचे ठरणार आकर्षण

Thane : पालकांनी मुदतीत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन; RTE प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी ४ ते १२ जूनदरम्यान

सौर कृषिपंपांमध्ये राज्याचा विक्रम; देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा वाटा ६४ टक्के