मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसजवळ जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या दोघांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. सध्या तुरुंगात कैद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने हा कट रचला होता. आरोपी वास्पी मेहमूद खान उर्फ वसीम चिकना आणि गौरव विनोद भाटिया उर्फ संदीप बिष्णोई या दोघांविरुद्ध पुरेसे ठोस पुरावे नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने दोघांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.
वास्पी चिकना आणि गौरव भाटिया या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आरोपींच्या जामीन अर्जावर पोलिसांतर्फे सरकारी पक्षाने आक्षेप घेतला होता. मात्र आरोपांबाबत ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. आरोपींनी सलमान खानला जीवे मारण्याचा कट व्हॉट्सॲप ग्रुपवर रचला होता आणि त्या ग्रुपवर तशी चर्चा झाली होती, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र आरोपींविरुद्ध त्याचा कोणताही ठोस पुरावा नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती बोरकर यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.