मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिले जाणारे २०२५ सालचे प्रतिष्ठेचे चित्रपती व्ही. शांताराम आणि स्वर्गीय राज कपूर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचाही विशेष योगदान पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी (दि.२९) या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतकारकीर्दीचा गौरव
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह भावगीत, भक्तिसंगीत, शास्त्रीय संगीत आणि काव्यसंगीताच्या क्षेत्रात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत त्यांना यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या संगीतबद्ध अनेक गाण्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
प्रसाद ओक आणि राणी मुखर्जी यांना विशेष योगदान पुरस्कार
मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनय आणि दीर्घ कारकिर्दीची दखल घेत अभिनेत्री राणी मुखर्जी यांना स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांची स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांनी शोले, दीवार, जंजीर यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा आणि पटकथा लिहिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पं. हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान, राणी मुखर्जी आणि प्रसाद ओक यांना शुभेच्छा देत, हे पुरस्कार चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभा, सर्जनशीलता आणि आजीवन समर्पणाचा गौरव करणारे असल्याचे म्हटले आहे. तसेच, चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानांपैकी असलेल्या 'चित्रपती व्ही. शांताराम' आणि 'स्व. राज कपूर' पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
दरवर्षी दिला जातो प्रतिष्ठेचा सन्मान
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय, संगीत, दिग्दर्शन, निर्मिती, पटकथा अशा विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाकडून चित्रपती व्ही. शांताराम आणि स्व. राज कपूर हे प्रतिष्ठेचे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. हे पुरस्कार चित्रपटसृष्टीतील मानाचा सन्मान मानले जातात.