मुंबई : भारतीय सिनेसृष्टीत महत्त्वाचे योगदान देणारे तसेच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते श्याम बेनेगल यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या श्याम बेनेगल यांनी सोमवारी संध्याकाळी ६.३८ वाजता मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘मंथन’, ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘भूमिका’ अशा अनेक समांतर सिनेमांचे निर्माते व दिग्दर्शक असलेले श्याम बेनेगल हे दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. तेव्हापासून त्यांच्यावर डायलिसिसवर उपचार सुरू होते. १४ डिसेंबर रोजी त्यांनी ९०वा वाढदिवस साजरा केला होता, यावेळी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीरा बेनेगल आणि मुलगी पिया बेनेगल असा परिवार आहे.
सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा विक्रम श्याम बेनेगल यांच्या नावावर आहे. त्यांना तब्बल १८ चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना १९७६ मध्ये ‘पद्मश्री’ आणि नंतर १९९१ मध्ये भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच एक फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे. ते भारतीय सिनेविश्वात ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते.
श्याम बेनेगल यांनी कलात्मक आणि समांतर चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अंकुर, निशांत, मंथन, जुबैदा, वेलकम टू सज्जनपूर हे त्यांनी दिग्दर्शन केलेले चित्रपट गाजले होते. त्यांना त्यांच्या सिनेमांसाठी २००५ साली प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ या दूरदर्शनवरील महत्त्वाकांक्षी मालिकेचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
१४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबाद येथे एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या श्याम सुंदर बेनेगल यांनी अर्थशास्त्रात शिक्षण घेतले. १२ वर्षांचे असताना त्यांनी फोटोग्राफर वडील श्रीधर बेनेगल यांच्यासोबत काम केले. वडिलांनी दिलेल्या कॅमेऱ्यावर त्यांनी पहिला चित्रपट बनवला. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीला उत्तम अभिनेते दिले, त्यात नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, अनंत नाग, शबाना आझमी, स्मिता पाटील आणि सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी यांची नावे घेता येतील.
श्याम बेनेगल यांनी तब्बल २४ चित्रपट, ४५ माहितीपट आणि १५पेक्षा जास्त जाहिरातपर चित्रपट बनवले आहेत. झुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस : द फॉरगॉटन हीरो, मंडी, आरोहन, वेलकम टू सज्जनपूर यांसारखे डझनभर उत्तम चित्रपट त्यांनी दिले आहेत. त्यांच्या ‘अंकुर’मुळे हिंदी सिनेसृष्टीला शबाना आझमी नावाची अभिनेत्री मिळाली. ‘अंकुर’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच ‘निशांत’, ‘मंथन’, ‘जुनून’, ‘आरोहण’ या त्यांच्या चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ‘महाभारत’ या संकल्पनेवर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘कलयुग’ हा सिनेमा आजही सर्वांच्या स्मरणात आहे. ‘सरदारी बेगम’ हा त्यांचा उर्दू सिनेमाही गाजला होता. एका मनस्वी दिग्दर्शकाने आज अखेरचा श्वास घेतला आहे. समांतर सिनेमाचे युग पोरके झाल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.
श्याम बेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. सह्याद्री फिल्म्स नावाच्या कंपनीचे ते मालक होते. त्यांनी ‘द चर्निंग विथ विजय तेंडुलकर (१९८४), सत्यजित रे (१९८८) आणि द मार्केटप्लेस (१९८९) या त्यांच्या स्वत:च्या चित्रपटांवर आधारित तीन पुस्तकेही लिहिली आहेत.
८ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
‘अंकुर’ (१९७४) या त्यांच्या पहिल्यावहिल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला तब्बल ४३ पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर निशांत (१९७५), मंथन (१९७६), भूमिका (१९७७), मम्मो (१९९४), सरदारी बेगम (१९९६) आणि जुबैदा (२००१) या त्यांच्या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.