मनोरंजन

उर्मिलासोबत काम करण्याचं श्रेयस तळपदेच स्वप्न होणार साकार

मनोज अवाना या चित्रपटांचे सहनिर्माते असून, सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप ऑनलाइन निर्माते आहेत

वृत्तसंस्था

अवघ्या मनोरंजन विश्वाला आश्चर्याचा सुखद धक्का देत मराठी सिनेसृष्टीनं एकाच वेळी तब्बल सात चित्रपटांची घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजवर हिंदीमध्ये बऱ्याच सुपरहिट चित्रपटांचं लेखन आणि निर्मिती करणाऱ्या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी एकत्रितपणे आगामी सात चित्रपटांची घोषणा केली आहे. बुधवारी मुंबईत संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मराठीतील दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांच्या साक्षीनं सात चित्रपटांची अधिकृत घोषणा करण्यात आली. मनोज अवाना या चित्रपटांचे सहनिर्माते असून, सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप ऑनलाइन निर्माते आहेत. या चित्रपटांच्या यादीतील 'ती मी नव्हेच' या महत्त्वपूर्ण चित्रपटानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

परितोष पेंटर यांनी लिहिलेल्या 'ती मी नव्हेच' या चित्रपटात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत हे हिंदी कलाविश्वातील नामवंत कलाकार प्रथमच मराठीमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. जुन्या आठवणींमध्ये रमलेल्या श्रेयस तळपदेनं दिलखुलासपणे संवाद साधला.त्यावेळेस श्रेयस म्हणाला , त्या काळी 'रंगीला'मधील 'या ही रे...' या गाण्यातील उर्मिलाच्या रुपानं सर्वांना घायाळ केलं होतं. त्याच उर्मिलासोबत कधी काळी स्क्रीन शेअर करायला मिळेल असं वाटलं नव्हतं. परितोषनं ही किमया साधली आहे. योगायोग म्हणजे आम्ही दोघेही मिठीबाई कॅालेजचे विद्यार्थी आहोत. उर्मिलासोबत काम करण्याची संधी मिळाल्यान खूप आनंदी आहे. 'ती मी नव्हेच' हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट असल्याचही श्रेयस म्हणाला.

'ती मी नव्हेच' असं म्हणत एका मोठ्या कालावधीनंतर उर्मिला मराठीमध्ये पुनरागमन करत आहे. अस्खलित मराठीत उत्स्फूर्तपणे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना उर्मिला म्हणाली की, चित्रपटाची कथा ऐकताक्षणी मला भावली. त्यामुळे पारितोषला नकार देऊच शकले नाही. 'ती मी नव्हेच'च्या माध्यमातून पारितोषसोबत काम करण्याचा आनंद तर आहेच शिवाय मराठी चित्रपटाद्वारे आणि श्रेयस तळपदेसारख्या सहकलाकारासोबत काम करायला मिळत असल्याचा विशेष आनंद झाल्याचं उर्मिला म्हणाली.

'ती मी नव्हेच' या चित्रपटासोबत 'निरवधी', 'सुटका', 'एप्रिल फुल', 'फक्त महिलांसाठी', 'थ्री चिअर्स' आणि 'एकदा येऊन तर बघा' हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत