दुबई-कुवैत सिटी : स्थलांतरित परदेशी कामगारांचे, मुख्यत्वे भारतीय कामगारांचे वास्तव्य असलेल्या कुवैतमधील एका बहुमजली इमारतीला बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत किमान ४९ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य भारतीयांचा समावेश आहे.
इमारतीला लागलेल्या आगीमुळे प्रचंड प्रमाणात धुराचे लोट वाहू लागले आणि तो धूर नाकातोंडात गेल्याने अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर या आगीतून अनेक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याचा दावाही केला जात आहे. कुवैतच्या मंगाफ परिसरातील या सहामजली इमारतीच्या स्वयंपाकघरात सर्वप्रथम आग लागली. या इमारतीमध्ये जवळपास २०० कामगारांचे वास्तव्य होते आणि ते सर्वजण एकाच कंपनीत कामाला होते, असे कळते. भारतीय राजदूत आदर्श स्वाइका यांनी घटनास्थळी भेट दिली असून स्थितीची पाहणी केली, त्यानंतर स्वाइका यांनी रुग्णालयास भेट दिली, तेथे ४५ जखमींना दाखल करण्यात आले असून त्यामध्ये बहुसंख्य भारतीय आहेत. स्वाइका यांनी फरवानिया रुग्णालय, अल-अदान रुग्णालय, मुबारक-अल कबीर रुग्णालय येथेही भेटी दिल्या असून जखमी भारतीय कामगारांची विचारपूस केली आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रचलित नियमांचे उल्लंघन केल्याने ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंतर्गत व्यवहारमंत्री शेख फहाद अल-युसुफ अल-सबाह यांनी ४९ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अंतर्गत व्यवहारमंत्र्यांनी या इमारतीला भेट दिली आणि इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. दक्षिण मंगाफ जिल्ह्यातील या इमारतीमध्ये अनेक कामगार वास्तव्याला होते त्यापैकी अनेकांनी आपले नागरिकत्व जाहीर केले नव्हते. कुवैतमध्ये स्थलांतरित कामगारांचे प्रमाण अधिक आहे. या सहामजली इमारतीच्या स्वयंपाकघराला आग लागली आणि ती झपाट्याने पसरली. या दुर्घटनेचे वृत्त समजताच येथील भारतीय दूतावासाने + ९६५-६५५०५२४६या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली असून संबंधितांना तेथे संपर्क साधण्याची सूचना केली आहे.
परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी या दुर्घटनेने धक्का बसल्याचे म्हटले असून आपले राजदूत घटनास्थळी गेले असल्याचे सांगितले.
मोदींकडून शोक व्यक्त
या दुर्घटनेमुळे आपल्याला वेदना झाल्या असून जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कुवैतमधील भारतीय दूतावासातील कर्मचारी स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि बाधितांच्या मदतीसाठी तेथील अधिकाऱ्यांना सहकार्य करीत आहेत, असे मोदी यांनी 'एक्स'वर म्हटले आहे. मोदी यांच्या आदेशावरून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हे तातडीने कुवैतला रवाना झाले आहेत.
मृतांमध्ये तामिळनाडू, केरळमधील अनेक जण
मृतांमध्ये बहुसंख्य भारतीयांचा समावेश असून ते केरळ, तामिळनाडू आणि उत्तरेकडील राज्यांमधील होते, त्याचप्रमाणे ते २० ते ५० वर्षे वयोगटातील होते, असे न्यायवैद्यक विभागाचे महासंचालक मे. जन. अल-ओवाहीहान यांनी सांगितले. मदतकार्य सुरू असताना अग्निशमन दलाचे पाच कर्मचारी जखमी झाले.