आंतरराष्ट्रीय

जोहान्सबर्गमध्ये ७३ जणांचा होरपळून मृत्यू

निवासी इमारतीला आग

नवशक्ती Web Desk

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात एक पाच मजली इमारत गुरुवारी आगीचे भक्ष्य ठरली. या आगीत मुलांसह तब्बल ७३ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ५२ जण गंभीर जखमी झाले असून काहीजण धुरामुळे घुसमटले गेले आहेत. या सर्वांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असल्याची माहिती इमर्जन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे प्रवक्ते रॉबर्ट मौलादझी यांनी दिली आहे. आगीचे कारण मात्र अजूनही उघड झालेले नाही. जोहान्सबर्गवासीयांसाठी मागील २० वर्षांतील हा सर्वात दु:खाचा दिवस ठरला आहे.

मौलादझी यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये किमान सात मुलांचा समावेश असून सर्वात लहाल मुलाचे वय दोन वर्षांपेक्षा कमी आहे. काही जणांचा तर जळून कोळसा झाल्याने त्यांना ओळखणे अशक्य झाले आहे. अग्निशमन दलाने आग विझवली असून आता तेथे प्रत्येक मजल्यावरील मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आपत्कालीन सेवक जळून खाक झालेले मृतदेह सतत बाहेर काढून रस्त्याच्या बाजूला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवत आहेत, असे एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने प्रत्यक्ष अपघात स्थळावरून सांगितले आहे. मौलादझी यांनी तर आपण उभ्या आयुष्यात अशी भयानक घटना पाहिली नसल्याचे म्हटले आहे. या आगीचे खरे कारण अजूनही समजले नसले तरी इमारतीत उजेडासाठी वापरण्यात आलेल्या मेणबत्त्यांमुळे ही आग लागल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली ही इमारत जोहान्सबर्गच्या गजबजलेल्या वस्तीत होती, मात्र ती रिकामी करण्यात आली होती. पण तेथे वंचित व स्थलांतरित लोक बेकायदेशीररीत्या राहात होते. इमारतीच्या आत एक सुरक्षा फाटक होते जे बंद होते. यामुळे लोक बाहेर पडू शकले नाहीत. यामुळे अनेक जळालेल्या शवांचा या फाटकाजवळच खच पडला होता. निकामी इमारतीत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्यांची संख्या या शहरात कमी नाही. अशा इमारती स्थानिक गुंडच भाड्याने देत असतात. या इमारतीत सुमारे ८० कुटुंबे राहात होती. इमारतीत जळावू सामानाचा वापर असल्यामुळे आग लागल्यानंतर ती अन्य माळ्यांवर वेगाने पसरली होती. अलीकडच्या काळातील दक्षिण आफ्रिकेतील ही सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे. गेल्या वर्षी जोहान्सबर्ग येथे इंधन टँकरचा स्फोट होऊन ४० लोक दगावले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत