आंतरराष्ट्रीय

एअर इंडिया एक्स्प्रेस कर्मचाऱ्यांचा संप मागे,कारवाईची पत्रे व्यवस्थापन मागे घेणार

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या एका गटाने संप मागे घेऊन सेवेत रुजू होण्याचे ठरविले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या एका गटाने संप मागे घेऊन सेवेत रुजू होण्याचे ठरविले आहे. कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, २५ कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबतची जारी करण्यात आलेली पत्रे मागे घेण्याचे एअरलाइन्सने मान्य केले आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचा व्यवस्थापन आढावा घेणार आहे. एअरलाइन्सच्या गैरव्यवस्थापनाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण देऊन कामावर गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारपासून १७० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली होती.

संप मागे घेण्याचा आणि सेवेतून कमी करण्यात आल्याबाबतची पत्रे मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि एअरलाइन्सचे प्रतिनिधी यांच्यात गुरुवारी मुख्य कामगार आयुक्तांच्या (केंद्र) कार्यालयात चर्चा झाल्यानंतर घेण्यात आला. आता एअर इंडिया एक्स्प्रेस आपल्या उड्डाणांचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे कधी सुरू करते त्याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी, विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाच्या निषेधार्थ आजारी असण्याचे कारण देऊन कामावर गैरहजर राहणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता.

गुरुवारीही ८५ उड्डाणे रद्द

एअर इंडिया एक्स्प्रेस विमान कंपनीला कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गुरुवारीही किमान ८५ उड्डाणे रद्द करावी लागली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल झाले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश