बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन Photo : X
आंतरराष्ट्रीय

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) अध्यक्षा आणि बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या.

Swapnil S

ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) अध्यक्षा आणि बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. दशकानुदशके देशाच्या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेल्या खालिदा झिया या शेख हसीना यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी होत्या.

खालिदा झिया गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. ढाका येथील एव्हरकेअर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या गेल्या अनेक वर्षांपासून हृदयविकार, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या, मधुमेह, फुफ्फुसाचे आजार, संधिवात आणि डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांशी झुंज देत होत्या. त्यांना पेसमेकर बसवण्यात आला होता आणि यापूर्वी त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रियाही झाली होती. लंडनमध्ये उपचार घेऊन त्या ६ मे रोजी बांगलादेशात परतल्या होत्या.

दोनदा नेतृत्व

झिया यांचा १९५९ मध्ये झियाउर रहमान यांच्याशी विवाह झाला होता, जे पुढे १९७७ मध्ये बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष बनले. मात्र, १९८१ मध्ये लष्करी उठावात पतीची हत्या झाल्यानंतर खालिदा झिया यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८४ मध्ये त्यांनी 'बीएनपी'ची धुरा आपल्या हाती घेतली. १९९१ मध्ये त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवत बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवला. त्यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ असे दोन वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले.

हसीना यांच्या प्रतिस्पर्धी

खालिदा झिया आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण जगाला ठाऊक आहे. अनेक दशके या दोन्ही नेत्यांनी बांगलादेशच्या राजकारणावर आपली पकड कायम ठेवली. विशेष म्हणजे, ज्या शेख हसीना यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता, त्या हसीना यांना २०२४ मधील जनक्षोभामुळे देश सोडून सध्या भारतात आश्रय घ्यावा लागला आहे.

मुलाच्या परतीनंतर निधन

खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान हे १७ वर्षांच्या वनवासानंतर नुकतेच लंडनहून बांगलादेशात परतले आहेत. देशात आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच झिया यांचे निधन झाल्याने 'बीएनपी' समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.

१० वर्षांची शिक्षा

२०१८ मध्ये खालिदा झिया यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी ढाका येथील विशेष न्यायालयाने त्यांना झिया अनाथालय ट्रस्टच्या नावाने सरकारी पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. खालिदा यांचा पुत्र तारिक आणि इतर ५ आरोपींनाही १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्यावर २.१ कोटी बांगलादेशी टकांचा दंडही ठोठावण्यात आला होता. तारिक आणि इतर २ आरोपी फरार झाले होते. झिया यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी न्यायालयाने सुनावणी करताना ही शिक्षा वाढवून १० वर्षे केली होती. यानंतर खालिदा यांनी शिक्षेविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची याचिका दाखल केली होती. ५ वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेमुळे यात विलंब होत राहिला.

एकत्र आंदोलन

शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्या मुक्त झाल्या होत्या. शेख हसीना यांच्या सत्तापालटाच्या एक दिवसानंतर, ६ ऑगस्ट २०२४ रोजी खालिदा झिया यांना सोडण्यात आले. त्यानंतर त्या अधिक उपचारांसाठी लंडनला गेल्या होत्या. ४ महिने तिथे राहिल्यानंतर त्या ६ मे रोजी मायदेशी परतल्या. बांगलादेशचे राजकारण प्रामुख्याने दोन नेत्यांभोवती फिरत राहिले, एक म्हणजे अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना आणि दुसरी बीएनपीच्या खालिदा झिया. १९८० च्या दशकात बांगलादेशात लष्करी राजवट होती. तेव्हा हसीना आणि खालिदा यांनी लष्करी राजवटीविरोधात एकत्र आंदोलन केले होते.

खालिदा यांचा जन्म १९४५ मध्ये झाला होता. त्या कोणत्याही राजकीय कुटुंबातून आल्या नव्हत्या आणि राजकारणाशी त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. १९६० मध्ये त्यांचे लग्न झियाउर रहमान या सैनिकाशी झाले. १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान, शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांना अटक करण्यात आली होती. याच काळात झियाउर रहमान यांनी रेडिओवर एक घोषणा वाचली, ज्यात त्यांनी 'स्वतंत्र बांगलादेशा'च्यावतीने लढत असल्याचे सांगितले.

पुन्हा पंतप्रधान

३० मे १९८१ रोजी रहमान यांची हत्या करण्यात आली. ते चितगावमध्ये होते, जेव्हा सैन्यातील काही बंडखोर अधिकाऱ्यांनी विद्रोह केला आणि गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर बीएनपी पक्ष विखरू लागला आणि पक्षाच्या नेत्यांनी खालिदा यांना नेतृत्व स्वीकारण्यासाठी तयार केले. सुरुवातीला त्या तयार नव्हत्या, पण १९८४ मध्ये त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. १९९१ मध्ये जेव्हा बांगलादेशात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने लोकशाही निवडणुका झाल्या, तेव्हा खालिदा झिया यांच्या बीएनपी पक्षाने विजय मिळवला आणि त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. १९९६ मध्ये त्यांना सत्ता गमवावी लागली, पण २००१ मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान बनल्या.

बॅटल ऑफ बेगम्स

१९९० मध्ये हुकूमशहा इरशाद यांची हकालपट्टी झाल्यानंतर लोकशाही परत आली. १९९१ मध्ये खालिदा झिया यांच्या निवडणुकीतील विजयानंतर, खालिदा आणि शेख हसीना यांच्यातील राजकीय वैर वाढले. १९९० नंतर बांगलादेशात जेव्हाही निवडणुका झाल्या, तेव्हा सत्ता एकतर खालिदा झिया यांच्याकडे गेली किंवा शेख हसीना यांच्याकडे. माध्यमांनी याला 'बॅटल ऑफ बेगम्स' म्हणजेच दोन बेगमांची लढाई असे नाव दिले होते.

BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर

३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर

संभाजीनगर महापालिकेत महायुती तुटली; शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे वातावरण

Thane Election : परिवहन मंत्री सरनाईक आणि खासदार म्हस्के यांच्या मुलांचे तिकीट कापले

मीरा-भाईंंदरमध्ये भाजप व शिंदे गट स्वबळावर; जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल