शेख हसीना यांचे संग्रहित छायाचित्र पीटीआय
आंतरराष्ट्रीय

बांगलादेशमध्ये परिस्थिती चिघळली; पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देशही सोडला, भारतात दाखल झाल्याची चर्चा

Swapnil S

बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून चिघळलेल्या आंदोलनामुळे आता पंतप्रधान शेख हसीना या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडून गेल्याचे वृत्त 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिले आहे.

या वृत्तानुसार, बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात, हसिना या देश सोडून गेल्या असून अंतरिम सरकार स्थापन केले जाईल, असे सांगितले.

शेख हसीना बहिणीसोबत भारतात दाखल?

मीडिया रिपोर्ट्समध्ये शेख हसीना या त्यांच्या बहिणीसोबत लष्करी हेलिकॉप्टरने उड्डाण करून भारताकडे निघाल्याचे म्हटले आहे. तर, सीएनएन न्यूज 18 ने, हसीना भारतातील ईशान्येकडील राज्य त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे उतरल्याचे म्हटले आहे. तथापि याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अधिकृत निवासस्थानात घुसले आंदोलक

हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सत्तारूढ अवामी पक्षाचे समर्थक यांच्यात रविवारी जोरदार धुमश्चक्री झाली होती. त्यामध्ये १४ पोलिसांसह ९१ जण ठार झाले आणि शेकडो जण जखमी झाले. सोमवारी आंदोलन आणखी तीव्र झाल्यानंतर हसीना यांनी दुपारी २.३० च्या सुमारास देश सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर राजधानी ढाका येथील शेख हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानावरही आंदोलकांनी हल्ला केला, घोषणाबाजी केली आणि विजयाची चिन्हे दाखवल्याचे वृत्त आहे. त्यासंदर्भातील काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हिडीओ संदेशही नाही देता आला

दुसरीकडे, शेख हसिना यांना देश सोडण्याआधी व्हिडीओतून देशातील नागरिकांना संदेश द्यायचा होता. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे आणि आंदोलक अधिकृत निवासस्थानाकडे निघाल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही व तातडीने देश सोडल्याचेही काही माध्यमांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरकारी नोकऱ्यांमधील वादग्रस्त कोटा प्रणाली रद्द करण्याची मागणी विद्यार्थी गटांनी केल्यानंतर गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या निदर्शने आणि हिंसाचाराने बांगलादेशमधील वातावरण तापले आहे. रविवारी हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सत्तारूढ अवामी पक्षाचे समर्थक यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. त्यामध्ये १४ पोलिसांसह ९१ जण ठार झाले आणि शेकडो जण जखमी झाले. हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असहकार आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलक जमले होते. अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. बांगलादेशातील १३ जिल्ह्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत ९१ जण ठार झाले. जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा आणि स्टेन ग्रेनेडचाही वापर करावा लागला. त्यामुळे बांगलादेशात पुन्हा एकदा अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ४जी इंटरनेट बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेत ज्येष्ठांसाठी मालडबा खुला करा; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

मराठा आरक्षणाचा वाद; राज्य सरकारला ‘तो’ अधिकार नाही - हाके

ठाणे स्थानकात उद्या रात्री ६ तासांचा पॉवर ब्लॉक, रात्री १०.३० ते पहाटे ४.३० पर्यंत गर्डर बसविण्याचे काम

सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक; 'हे' Video केले अपलोड

जालन्यात एसटी बस-टेम्पोचा भीषण अपघात; बसच्या वाहकासह सहा जण ठार, १७ जखमी