'बॅटल ऑफ गलवान'च्या ट्रेलरमध्ये सलमान खान 
आंतरराष्ट्रीय

चीनचा तीळपापड! 'इतिहास बदलू शकत नाही'; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चा ट्रेलर बघून तीव्र प्रतिक्रिया

'ग्लोबल टाइम्स' या चीनच्या सरकारी वृत्तपत्राने 'बॅटल ऑफ गलवान'च्या ट्रेलरवरून भारतावर आगपाखड केली आहे. एक लांबलचक रिपोर्ट या वृत्तपत्राने प्रकाशित केला असून 'भारतीय चित्रपट इतिहास बदलू शकत नाहीत' असे म्हटले आहे. चीनमधील नेटिझन्सही टीकास्त्र सोडत आहेत.

Krantee V. Kale

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. २७ डिसेंबर रोजी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र हा ट्रेलर बघून चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे.

'ग्लोबल टाइम्स' या चीनच्या सरकारी वृत्तपत्राने 'बॅटल ऑफ गलवान'च्या ट्रेलरवरून भारतावर आगपाखड केली आहे. एक लांबलचक रिपोर्ट या वृत्तपत्राने प्रकाशित केला असून 'भारतीय चित्रपट इतिहास बदलू शकत नाहीत' असे म्हटले आहे. चीनमधील नेटिझन्सही टीकास्त्र सोडत आहेत.

काय म्हटलंय ग्लोबल टाइम्समध्ये?

बॉलिवूड चित्रपट जास्तीत जास्त मनोरंजनावर आधारित आणि भावनिक रंग चढवलेले चित्रण करतात. मात्र, कोणतीही सिनेमॅटिक अतिशयोक्ती इतिहास बदलू शकत नाही किंवा चीनच्या सार्वभौम भूभागाचे संरक्षण करण्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) निर्धाराला डगमगवू शकत नाही, असे एका चीनी तज्ज्ञाने म्हटले आहे. तर, भारत चित्रपटांचा वापर करून राष्ट्रवादी भावना भडकवतो, असे चीनी लष्करी तज्ज्ञ सॉन्ग झोंगपिंग यांनी सांगितले. गलवान खोरे हे चीनच्या नियंत्रणाखालीच आहे अशी वल्गनाही ग्लोबल टाइम्सने केली आहे.

आधी भारतानेच सीमारेषा ओलांडल्याचा दावा

झोंगपिंग यांनी सोमवारी ग्लोबल टाइम्सशी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी भावना भडकवण्यासाठी भारताकडून, विशेषतः बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून, केले जाणारे प्रयत्न आश्चर्यकारक नाहीत. यात काही नवीन नाही. ही बाब खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आणि राजकीय परंपरेचेच प्रतिबिंब आहे. चित्रपट कितीही नाट्यमय किंवा अलंकारिक,अतिरंजित पद्धतीने घटना मांडोत, पण गलवान खोऱ्यातील घटनेची मूळ तथ्ये बदलू शकत नाहीत. भारतानेच प्रथम सीमारेषा ओलांडली होती आणि पीएलएने कायद्यानुसार चीनच्या भूभागाचे संरक्षण केले. ही घटना चिनी समाजात खोलवर रुजलेली असेही ते म्हणाले.

संबंध सुधारत असताना चित्रपट प्रदर्शित करणे अयोग्य

दरम्यान, चायना इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधील आशिया-पॅसिफिक अभ्यास विभागाचे संचालक लान जिआनशुए यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितले की, या चित्रपटाची थीम आणि वेळ अयोग्य आहे. कारण हा चित्रपट केवळ भारताची एकतर्फी बाजू दाखवतो. चीन-भारत संबंध सुधारत असताना हा चित्रपट प्रदर्शित करणे अयोग्य आहे. याद्वारे अनावश्यक तणाव वाढतो आणि द्वेषपूर्ण, विरोधी भावनांना चिथावणी मिळते.

चीनी नेटकऱ्यांकडूनही खिल्ली

चीनमधील नेटिझन्सनीही चित्रपटावर तीव्र टीका केली असून तेथील Weibo या सोशल मीडियावर “जेव्हा इतिहास कमी पडतो तेव्हा बॉलिवूड पुढे येतो,” अशी खिल्ली उडवली आहे. बॅटल ऑफ गलवानच्या ट्रेलरमुळे पुन्हा एकदा गलवान संघर्षाच्या आठवणी आणि दोन्ही देशांतील मतभेद जागे झाले आहेत.

गलवानमध्ये काय झालं होतं?

गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती, ज्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर, चीनचेही ४० जवान शहीद झाल्याचे वृत्त होते. घटनेनंतर भारताने आपल्या शहीद झालेल्या जवानांची संख्या सांगितली. मात्र, चीनने मोठ्या प्रमाणावर गुप्तता बाळगली होती. त्यानंतर जवळपास ३ महिन्यांनी गलवनानमध्ये चार सैनिक मारले गेल्याचे त्यांनी स्वीकारले. हा संघर्ष LAC (Actual Line of Control) वर झाला, ज्यात शस्त्रे नसतानाही दगडफेक, बांबू आणि लोखंडी सळ्यांनी झटापट झाली, ज्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, गलवानमध्ये चिनी विश्वासघाताला प्रत्युत्तर देताना शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबूच्या भूमिकेत सलमान खान या चित्रपटात दिसणार आहे.

BMC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर ; एकूण ९४ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात, वाचा सर्व उमेदवारांची नावे

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

आधी लाथा-बुक्क्या, आता जादू की झप्पी; व्हायरल झालेल्या 'त्या' डॉक्टर आणि पेशंटचं भांडण मिटलं, नेमकं प्रकरण काय?

'मला सतत मेसेज करायचा'...; सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक दावा करणारी खुशी मुखर्जी कोण?

“पूर्वी शिवसेना भाजपला जागा वाटायची, पण आज..." ; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात