वॉशिंग्टन : जगातील सध्या सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला आहे. या एआयमुळे काम सोपे व वेगाने होईल, असे पाहिले जात होते. आता ‘एआय’च्या प्रभावामुळे जगातील तंत्रज्ञ व उद्योगपती चिंतेत पडले आहे. भविष्यात मानवासाठी ४० टक्के नोकऱ्या राखीव ठेवाव्यात, असे आवाहन जागतिक उद्योगपती बिल गेटस् यांनी केले आहे.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी ‘एआय’च्या भविष्याबाबत एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
ते म्हणाले की, जस-जसे ‘एआय’ व रोबोट अधिक सक्षम होतील. त्यामुळे समाजाला काही कामे आणि नोकऱ्या केवळ माणसांसाठी सुरक्षित ठेवाव्या लागू शकतात. त्यांनी या कल्पनेला ‘मानवी आरक्षण’ असे नाव दिले आहे.
जागतिक वृत्तसंस्थेसोबत बोलताना ते म्हणाले की, सध्याच्या नोकऱ्यांपैकी सुमारे ४०% कामे माणसांसाठी राखीव ठेवण्यावर विचार केला जाऊ शकतो. ‘एआय’ केवळ काही सामान्य कामांना स्वयंचलित करणार नाही, तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मानवी श्रमाची जागा घेण्याची क्षमता बाळगत आहे. हीच ती वेळ आहे ज्यामुळे येणाऱ्या वर्षांत रोजगाराचा मुद्दा आणखी महत्त्वाचा ठरू शकतो. ‘एआय’ बाबत सरकार, कंपन्या आणि समाजाने आतापासूनच गंभीरतेने विचार करायला हवा. त्यांचा सल्ला भारतासारख्या देशासाठीही महत्वाचा आहे. तथापि, गेट्स यांची ‘मानवी आरक्षण’ ही कल्पना सामाजिक किंवा जातीय आरक्षणापेक्षा वेगळी आहे. याचा उद्देश ‘एआय’ मुळे माणसांकडून हिरावल्या जाऊ शकणाऱ्या कामांना सुरक्षित ठेवणे हा आहे.
जागतिक आर्थिक फोरमच्या जानेवारी २०२६ च्या आकडेवारीनुसार, ५४% उद्योगपतींना अशी अपेक्षा आहे की ‘एआय’ त्यांच्या कंपन्यांमधील सध्याच्या नोकऱ्या कमी करू शकतो, तर केवळ २४ टक्के लोकांना नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
‘एआय’ चा धोका बेरोजगारीपुरता मर्यादित नाही. नोकरी लोकांना उत्पन्नासोबतच ओळख, उद्देश आणि समाजाशी जोडले जाण्याची भावनाही देते.
‘एआय’ अनेक कामांवर परिणाम होईल
अँथ्रॉपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमॉडेई यांनीही इशारा दिला की, एआय येणाऱ्या काळात कामगारांच्या बाजारात अत्यंत कठीण बदल आणू शकतो. कारण हा एकाच वेळी अनेक व्यवसायांमध्ये मानवी कामावर परिणाम करू शकतो.