बीजिंग : चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर (चीनमधील यारलुंग त्सांगपो) जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरू केले आहे. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी शनिवारी त्याचे उद्घाटन केले. या धरणामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या भारतातील प्रवाहावर परिणाम होण्याची भीती भारताने व्यक्त केली आहे.
हे धरण उभारण्यासाठी सुमारे १२ लाख कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील न्यिंगची शहरात हे धरण बांधले जात आहे. भारत आणि बांगलादेश दोघांनीही या धरणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, या प्रकल्पात पाच कॅस्केड जलविद्युत केंद्रे असतील. या प्रकल्पातून दरवर्षी ३०० अब्ज किलोवॅट-तासांपेक्षा जास्त वीजनिर्मिती होईल. ही वीज ३० कोटी लोकांच्या गरजा पूर्ण करू शकते, असा चीनचा दावा आहे.
भारतही बांधतोय ब्रह्मपुत्रावर धरण
भारतही अरुणाचल प्रदेशात या नदीवर एक मोठे धरण बांधत आहे. २००६ पासून, ब्रह्मपुत्रा आणि सतलजवरील पाण्याच्या प्रवाहाच्या आकडेवारीबाबत भारत आणि चीनच्या तज्ज्ञ पातळीवरील यंत्रणेत याबाबत चर्चा चालू आहे. त्यामुळे चीन हळूहळू ब्रह्मपुत्रेच्या पाण्याची पातळी आणि दिशा ताब्यात घेऊ शकतो, अशी भीती भारताने व्यक्त केली आहे.
भारताचा धरणाला विरोध
ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणारे धरण तिबेट पठाराच्या पूर्वेकडील काठावर हिमालयाच्या एका विस्तीर्ण दरीत बांधले जाईल. या भागात वारंवार भूकंप होतात. धरणाच्या बांधकामामुळे परिसंस्थेवर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे अनेक अपघात होऊ शकतात. भारताच्या ईशान्येकडील राज्ये आधीच पूरग्रस्त परिस्थितींना तोंड देत असून हवामान बदलामुळे त्यांना भूस्खलन, भूकंप आणि पूर इत्यादी आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळेच या धरणाच्या बांधकामामुळे भारताची चिंता वाढली आहे.