बीजिंग : अमेरिका व चीनमध्ये व्यापारयुद्ध चिघळले असतानाच चीनने अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या देशांना गंभीर इशारा दिला आहे. ‘अमेरिकेशी करार करून आमचे नुकसान केल्यास आम्ही तुमच्यावर कारवाई करू’, अशी धमकी चीनने दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांवर १० टक्के टॅरिफ लावले आहे, तर चीनवर २४५ टक्के कर लावला आहे. चीननेही अमेरिकन मालावर १९५ टक्के टॅरिफ लावला आहे.
ट्रम्प प्रशासनाने सांगितले की, अमेरिकेसोबत अनेक देश टॅरिफ कमी करण्यासाठी चर्चा करत आहेत. त्यावर चीनच्या व्यापार खात्याने सांगितले की, अमेरिकेसोबत अन्य देशांच्या व्यापक आर्थिक करारांना आमचा विरोध आहे. कारण ते आमच्या हितांविरोधात आहे. तडजोड केल्याने आदर मिळत नाही, हे लक्षात ठेवा. अन्य कोणाच्या हितासाठी दुसऱ्याचा स्वार्थ पूर्ण करण्याच्या मानसिकतेने दोघांचे नुकसान होईल. चीनच्या हितांविरोधात कोणत्याही कराराला चीनचा विरोध आहे. चीन ते कदापि सहन करणार नाही आणि प्रत्युत्तरादाखल कारवाई करेल, असे चीनने सांगितले.
अमेरिकेकडून व्यापारी देशांवर पहिल्यांदा टॅरिफ लावून नंतर त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणे ही चुकीचे आहे. चीन आपले हित व अधिकारांचे संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ आहे, असा इशारा चीनने दिला.