तैपेई : चिनी सैन्याने गुरुवारी तैवानभोवती दोन दिवसीय कवायती सुरू केल्या. त्यात लष्कर, नौदल, हवाई दल आणि रॉकेट दल यांचा समावेश होता. तैवानचे नवे अध्यक्ष लाइ चिंग-टे यांनी चीनचे सार्वभौमत्वाचे दावे नाकारत स्वातंत्र्य समर्थक वक्तव्ये केल्याची शिक्षा देण्यासाठी या कवायती आयोजित केल्याचे चीनने म्हटले आहे. या कवायती म्हणजे प्रादेशिक शांतता आणि स्थिरता बिघडवणारी चिथावणी असल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तैवानच्या नवीन अध्यक्षांनी या आठवड्यात पदभार स्वीकारला. या वर्षी जानेवारीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर लाइ चिंग-टे यांनी केलेल्या भाषणात चीनने तैवानला धमकावणे थांबवण्याचे आवाहन केले. तैवान सामुद्रधुनीतील स्थिती कायम ठेवण्याचे आश्वासन दिले आणि बीजिंगला शांततेसाठी संयुक्तपणे काम करण्याचे आवाहन केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी लाइ यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद केला. तैवानचे स्वातंत्र्य संपले आहे. कोणत्याही सबबी किंवा बॅनरखाली त्याचा पाठपुरावा केला जात असला तरी, तैवानच्या स्वातंत्र्याचा प्रयत्न अयशस्वी होणार आहे, असे वांग यांनी बीजिंग येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) ईस्टर्न थिएटर कमांडने गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता तैवान बेटाच्या सभोवताली संयुक्त लष्करी कवायती सुरू केल्या. तैवान सामुद्रधुनीची देखरेख करणाऱ्या पीएलए इस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते ली शी म्हणाले, तैवानच्या फुटीरतावादी कृत्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आणि बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपविरुद्ध या कवायती आयोजित केल्या आहेत. तैवान सामुद्रधुनी, तैवान बेटाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेला तसेच किनमेन, मात्सू, वुकीऊ आणि डोंगयिन या बेटांच्या आसपासच्या भागात या कवायती केल्या जात आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या तत्कालीन स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. त्यावेळीही चीनने अनेक दिवस तैवानभोवती अशाच लष्करी कवायती केल्या होत्या.
तैवानची सेनादले सज्ज
चीनने सुरू केलेल्या लष्करी कवायतींनंतर तैवानने त्यांच्या सेनादलांना सतर्क केले आहे. तैवानने लष्कर, नौदल आणि क्षेपणास्त्र दलांना सज्ज ठेवले आहे. तैवानची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे कोणत्याही क्षणी कारवाईसाठी तयार आहेत. अमेरिका आणि जपानने तैवानला पाठिंबा व्यक्त करत चीनच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे.