न्यूयॉर्क : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन इस्रायलला २.८ अब्ज डॉलर्स (सुमारे २६,००० कोटी रुपये) किमतीची शस्त्रास्त्रे पुरवण्याची तयारी करत आहे. या पॅकेजमध्ये ४० हजार विध्वंसक अवजड बॉम्बचा समावेश आहे. या प्रत्येक बॉम्बचे वजन २ हजार पौंड (सुमारे ९०० किलो) इतके आहे. या बॉम्बचा पुरवठा यापूर्वी जो बायडेन यांनी २०२४ मध्ये थांबवला होता.
प्रस्तावित शस्त्र पॅकेजमध्ये २०,००० एमके-८४ बॉम्ब आणि २०,००० बीएलयू-११७ बॉम्बचा समावेश आहे. या कराराला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, याबद्दल काँग्रेसला अनौपचारिकपणे सूचित करण्यात आले आहे. २०२४ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने या २ हजार पौंड वजनाच्या बॉम्बची एक खेप इस्त्रायलला पाठवण्यावर बंदी घातली होती. त्यावेळी अशी भीती व्यक्त केली जात होती की, गाझासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात या बॉम्बचा वापर केल्यास मोठ्या संख्येने जीवितहानी होऊ शकते.
ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर ही बंदी उठवण्यात आली. आता त्यांचे प्रशासन याच प्रकारच्या मोठ्या संख्येने बॉम्बचा पुरवठा करण्यासाठी एका नवीन कराराची तयारी करत आहे.
ट्रम्प यांची शस्त्रास्त्र विक्रीला मंजुरी
ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षीच इस्रायलला सुमारे ३ अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्र विक्रीला मंजुरी दिली होती. यामध्ये ३५,५०० हून अधिक जड बॉम्बचा समावेश होता. त्यानंतर, जानेवारी महिन्यात इस्रायलला ६.६७ अब्ज डॉलर्सच्या आणखी एका शस्त्रास्त्र विक्रीला मंजुरी देण्यात आली.