आता तुम्हीच होर्मुझ सांभाळा! ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत; कोणते हेतू साध्य झाले त्याची यादीच दिली  Photo : X
आंतरराष्ट्रीय

आता तुम्हीच होर्मुझ सांभाळा! ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत; कोणते हेतू साध्य झाले त्याची यादीच दिली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्धचे युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्रथ सोशलवर एक पोस्ट केली आहे. अमेरिका आपले निश्चित केलेले लक्ष्य प्राप्त करण्याच्या अगदी जवळ असल्याचे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. आता होर्मुझ सामुद्रधुनीची सुरक्षा अन्य देशांना करावी, असा इशारा त्यांनी दिला.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्धचे युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्रथ सोशलवर एक पोस्ट केली आहे. अमेरिका आपले निश्चित केलेले लक्ष्य प्राप्त करण्याच्या अगदी जवळ असल्याचे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. आता होर्मुझ सामुद्रधुनीची सुरक्षा अन्य देशांना करावी, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिकेने इस्रायलच्या साथीने २८ फेब्रुवारीला इराणवर हवाई हल्ले केले. यानंतर गेल्या ३ आठवड्यांपासून मध्य पूर्वेत संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष थांबण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.

आम्ही आपले लक्ष्य साध्य करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. मध्य पूर्वेतील सैन्य कारवाई संपवण्याच्या विचारात आहोत, असा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. इराण विरोधात केलेल्या कारवायांमधून काय काय साधले, याचाही उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.

यादीच सादर

इराणवर हल्ले करुन कोणकोणते हेतू साध्य केले, त्याची एक यादीच ट्रम्प यांनी दिली आहे. इराणची क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे नष्ट करणे, इराणच्या संरक्षणाचा औद्योगिक आधार नष्ट करणे, इराणचे नौदल आणि हवाई दल संपवणे, इराण कधीही अण्वस्त्र तयार करण्याच्या जवळपास जाणार नाही याची खात्री करणे आणि मध्य पूर्वेतील आपल्या मित्र देशांना- इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, यूएई, बहरीन, कुवेत आणि अन देशांना उच्च दर्जाचे संरक्षण देणे हे हेतू साध्य झाले असल्याची एक यादीच ट्रम्प यांनी दिली आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करण्यात ट्रम्प यांना अपयश आल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळेच त्यांनी येथून काढता पाय घेण्याचे ठरवले आहे. ज्या देशांना होर्मुझमधून खनिज तेल मिळते, जे देश तेल वाहतुकीसाठी होर्मुझवर सर्वाधिक अवलंबून आहेत, त्यांनी येथील वाहतुकीची जबाबदारी घ्यावी, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. होर्मुझची सुरक्षा त्याच देशांनी करावी, जे या मार्गाचा वापर करतात, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

युद्ध थांबणार?

ट्रम्प यांचा युद्ध संपवण्याचा दावा त्यांच्या प्रशासकीय निर्णयांशी अगदी विसंगत आहे. याच आठवड्यात ट्रम्प प्रशासनाने युद्धासाठी काँग्रेसकडे ३०० अब्ज डॉलरची मागणी करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच मध्य पूर्वेत आणखी तीन एम्फीबियस असॉल्ट जहाजे आणि २५०० अतिरिक्त मरीन सैनिक पाठवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. हे सैनिक इराणच्या दिशेने रवानाही झाले आहेत.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल