संग्रहित छायाचित्र 
आंतरराष्ट्रीय

Donald Trump tariff policy : ट्रम्प आणखी एक धक्का देणार; औषधांवर कर लावण्याची तयारी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले टॅरिफ वॉर अधिकाधिक तीव्र करण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने अनेक देशांचे धाबे दणाणले आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले टॅरिफ वॉर अधिकाधिक तीव्र करण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने अनेक देशांचे धाबे दणाणले आहे. ट्रम्प यांनी आता फार्मा उत्पादनांवर म्हणजेच औषधे आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबधित अन्य उत्पादनांवर मोठा कर लावणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ (आयात शुल्क) वॉरमुळे जगभरातील अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले आहेत. चीनवर अमेरिकेने सर्वाधिक १०४ टक्के आयात शुल्क लादले आहे. त्याच्या प्रत्युत्तरात चीनने अमेरिकन वस्तूंवर आणखी ८४ टक्के आयात शुल्क लावत असल्याची घोषणा केली. तसेच अमेरिकेने भारतीय मालावर २७ टक्के आयात शुल्क लावले आहे.

नॅशनल रिपब्लिकन काँग्रेस कमिटीच्या एका बैठकीला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध उत्पादनांवरील टॅरिफबाबतचे वक्तव्य केले. आपला निर्णय पटवून देताना ते म्हणाले, आपल्या सरकारचे हे पाऊल औषध उत्पादकांना त्यांचे व्यवसाय पुन्हा अमेरिकेत आणण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. या कंपन्या अमेरिकेत उत्पादन करणार नसतील तर त्यांना भरमसाठ उत्पादन शुल्क भरावे लागेल.

भारताला बसेल मोठा फटका

ट्रम्प यांनी औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर आयात शुल्क लागू केले तर त्याचा भारतावर मोठा परिणाम होईल. अमेरिकेला औषधपुरवठा करणाऱ्या देशांमध्ये भारत हा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. २०२४ मध्ये भारताने तब्बल १२.७२ अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीच्या औषधांची निर्यात केली आहे. त्यापैकी ८.७ अब्ज डॉलर किंमतीची औषधे एकट्या अमेरिकेला पाठवण्यात आली आहेत. दुसऱ्या बाजूला भारत अमेरिकेकडून केवळ ८०० दशलक्ष डॉलर किंमतीची औषधे आयात करतो. त्यामुळे अमेरिकेने औषधांवर आयात शुल्क लादल्यास भारतावर त्याचे गंभीर परिणाम होतील.

अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर भारत १०.९१ टक्के आयात शुल्क आकारतो. मात्र, अमेरिका भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर कोणत्याही प्रकारचे आयात शुल्क आकारत नाही. याआधी ट्रम्प यांनी विविध देशांवर आयात शुल्क लावले तेव्हा त्यांनी औषधे व इतर फार्मा उत्पादनांना त्यातून वगळले होते. मात्र, आता ट्रम्प औषधे व फार्मा उत्पादनांवर आयात शुल्क लावण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेतील माध्यमांनी दावा केला आहे की ट्रम्प आजच याबाबतची मोठी घोषणा करू शकतात.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश