मॉस्को : युक्रेनच्या सैन्याने रविवारी रात्री रशियावर १,००० हून अधिक ड्रोनद्वारे हल्ला केला. यातील शेकडो ड्रोन राजधानी मॉस्कोच्या दिशेने डागण्यात आले. रशियातील संसदीय निवडणुकांचा तिसरा आणि अंतिम दिवस संपत असतानाच हा मोठा हल्ला झाला.
मॉस्कोच्या महापौरांनी राजधानीवरील हा आतापर्यंतचा ‘सर्वांत मोठा ड्रोन हल्ला’ असल्याचे वर्णन केले. या हल्ल्यात मॉस्कोतील तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि एका निवासी इमारतीचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
मॉस्को परिसरात झालेल्या या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले, अशी माहिती स्थानिक गव्हर्नर आंद्रेई व्होरोब्योव्ह यांनी दिली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर सांगितले की, या हल्ल्यात युक्रेनने विविध क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर केला. यामध्ये युक्रेनमध्येच विकसित केलेल्या ‘फ्लेमिंगो’ आणि ‘पेलिकन’ क्षेपणास्त्रांचाही समावेश होता. तेल आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित सुविधांना लक्ष्य करण्यात आले. युद्ध सुरू ठेवण्यासाठी अब्जावधी डॉलरचा निधी आवश्यक असतो, असे झेलेन्स्की यांनी म्हटले. रशियाच्या अर्थव्यवस्थेवर आर्थिक दबाव निर्माण करण्याचा युक्रेनचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, राजधानीच्या दिशेने येणारे ४५० ड्रोन नष्ट केले. या हल्ल्यात मॉस्को तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि एका निवासी इमारतीचे नुकसान झाले.