हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?  (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

Eiffel Tower : दरवर्षी जवळपास ७० लाख पर्यटक भेट देणाऱ्या आयफेल टॉवरला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एक दिवस बंद ठेवावे लागले.

किशोरी घायवट-उबाळे

पॅरिस : हिंदू धार्मिक गटाच्या खासगी भेटीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या लिंगामुळे बाजूला करण्यात आल्याच्या आरोपावरून पॅरिसमधील जगप्रसिद्ध 'आयफेल टॉवर'वर वाद निर्माण झाला. शनिवारी (दि. ५) BAPS च्या सुमारे १०० सदस्यांच्या शिष्टमंडळाने आयफेल टॉवरला भेट दिली होती. या भेटीदरम्यान काही महिला कर्मचाऱ्यांना विशिष्ट भागातून दूर राहण्याच्या तसेच त्यांच्या जागी पुरुष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. या प्रकाराच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ७) कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने आयफेल टॉवर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला. दरम्यान, BAPS ने या घटनेमुळे कोणाला वेदना किंवा गैरसोय झाली असेल तर माफी मागितली असून, मंगळवारी, ८ सप्टेंबरला आयफेल टॉवर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

शनिवारी 'बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था' (BAPS) च्या हिंदू धार्मिक शिष्टमंडळाने फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेल्या आयफेल टॉवरला भेट दिली. BAPS चे सुमारे १०० प्रतिनिधी पॅरिसजवळील संस्थेच्या नव्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झाले होते. या भेटीपूर्वी शिष्टमंडळाकडून महिलांशी संवाद कमीत कमी राहील, अशा पद्धतीने भेटीची व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली होती.

आयफेल टॉवरचे संचालन करणाऱ्या Société d'Exploitation de la tour Eiffel (SETE) कंपनीने ही विनंती मान्य केल्याचे म्हटले. मात्र, नंतर कंपनीने स्पष्ट केले की, "या अटी मान्य करायला नको होत्या."

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी आयफेल टॉवरमधील तसेच कंत्राटदारांच्या काही महिला कर्मचाऱ्यांना स्वतःला 'अदृश्य' ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून दुसऱ्या भागात जाण्यास सांगण्यात आले, तर काही ठिकाणी त्यांच्या जागी पुरुष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

महिला कर्मचाऱ्यांचा निषेध

या प्रकारामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. महिला असल्यामुळे आपल्याला कामाच्या ठिकाणापासून दूर करण्यात आल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी या सूचनांचा निषेध केला. याच पार्श्वभूमीवर सोमवारी कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आयफेल टॉवर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला.

दरवर्षी जवळपास ७० लाख पर्यटक भेट देणाऱ्या आयफेल टॉवरला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एक दिवस बंद ठेवावे लागले.

BAPS कडून माफी

या वादानंतर BAPS ने भूमिका स्पष्ट केली. संस्थेने म्हटले की, कोणालाही आयफेल टॉवरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले नव्हते. शिष्टमंडळाचा आकार मोठा असल्याने इतर पर्यटकांना अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी आयफेल टॉवरच्या टीमसोबत समन्वय साधून ही भेट आयोजित करण्यात आली होती. मात्र, या घटनेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा गैरसोय झाली असेल तर त्याबद्दल संस्थेने माफी मागितली.

पॅरिसजवळ BAPS च्या मंदिराचे उद्घाटन

जेव्हा BAPS ने रविवारी पॅरिसजवळ फ्रान्समधील आपल्या पहिल्या मोठ्या मंदिराचे उद्घाटन केले, तेव्हा हा वाद समोर आला. संस्थेचे आध्यात्मिक प्रमुख महंत स्वामी महाराज यांनी मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. BAPS च्या म्हणण्यानुसार, जगभरात संस्थेची १,३०० हून अधिक मंदिरे आहेत.

फ्रान्समध्ये राजकीय प्रतिक्रिया

आयफेल टॉवरवरील या घटनेवर फ्रान्सच्या लैंगिक समानता मंत्री ऑरोर बेर्गे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "फ्रान्समध्ये आम्ही महिलांना स्वतःला मिटवून टाकण्यास सांगत नाही," असे त्या म्हणाल्या.

राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील नेत्यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. मरीन ले पेन यांनी महिलांची उपस्थिती मर्यादित करण्याची कल्पना फ्रान्स कधीही स्वीकारणार नसल्याचे म्हटले. तर गॅब्रिएल अत्ताल यांनी फ्रान्समध्ये कोणत्याही संस्कृती, विश्वास किंवा धर्माला महिलांचे स्थान ठरवण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.

आयफेल टॉवर पुन्हा खुला

कर्मचाऱ्यांच्या निषेधामुळे सोमवारी बंद ठेवण्यात आलेला आयफेल टॉवर मंगळवारी सकाळी पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे धार्मिक गटांच्या विशेष मागण्या, कार्यस्थळी महिलांशी समान वागणूक आणि फ्रान्समधील लैंगिक समानतेच्या धोरणावर चर्चा सुरू झाली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू

लाऊडस्पीकर लावा, पण नियमांचे पालन करा! समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन, बाप्पाच्या उंचीबाबत तज्ज्ञांची नियुक्ती करावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; जागतिक फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन