भारतीय विद्यार्थ्यांच्या परदेशात शिक्षण घेण्याच्या पसंतीत मोठा बदल दिसून येत आहे. upGrad Transnational Education (TNE) रिपोर्ट २०२४ नुसार, जर्मनी आता भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात आवडते शैक्षणिक स्थळ बनले आहे. गेल्या काही वर्षांत जर्मनीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १३.२ टक्के वरून ३२.६ टक्के पर्यंत वाढली आहे. ही आकडेवारी भारतातील विद्यार्थ्यांच्या पसंतीत मोठा बदल सूचित करते.
आतापर्यंत सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण असलेला अमेरिका देश आता मागे पडला आहे. अमेरिकेसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत १३ टक्के घट झाली आहे. कॅनडा सुद्धा मागे राहिला असून, येथील भारतीय विद्यार्थ्यांचा वाटा १७.८५ टक्के वरून ९.३ टक्के पर्यंत घटला आहे. कठीण व्हिसा नियम, वाढते शैक्षणिक खर्च आणि पोस्ट-स्टडी संधींचा अनिश्चितपणा ही या बदलामागची मुख्य कारणं असल्याचे मानली जात आहे.
तसेच, युएई हे देखील भारतीय विद्यार्थ्यांसाठी आकर्षक ठिकाण ठरत आहे. युएईमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ४२ टक्के भारतीय आहेत. आयर्लंड (३.९ टक्के), फ्रान्स (३.३ टक्के) आणि इतर युरोपियन देशांमध्येही भारतीय विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे.
रिपोर्टनुसार, आता विद्यार्थ्यांचे लक्ष फक्त कायम राहण्याच्या संधीवर नाही, तर भविष्यातील करिअर संधींवर जास्त आहे. सुमारे ४६ टक्के विद्यार्थ्यांनी करिअरच्या संधीला जास्त महत्त्व दिले आहे. तरीही, शिक्षणासाठी पैसे जमवणे हा एक मोठा मुद्दा आहे. अंदाजे ३३ टक्के विद्यार्थी शिक्षण कर्जावर अवलंबून असतात, तर २८ टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची मदत मिळते.
विद्यार्थ्यांच्या कोर्सच्या निवडीत मास्टर्स पदवी सगळ्यात लोकप्रिय ठरली आहे. अंदाजे ८६.५ टक्के विद्यार्थ्यांनी पोस्टग्रॅज्युएट प्रोग्राम्सची निवड केली आहे. मेनेजमेंट आणि MBA अभ्यासक्रमांची आवडही वाढत आहे; गेल्या तीन वर्षांत त्यात ३० टक्के वरून ५५.६ टक्के वाढ झाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान (STEM) क्षेत्र अजूनही विद्यार्थी पसंत करतात, सुमारे ३८.९ टक्के विद्यार्थ्यांनी हे क्षेत्र निवडले आहे.
एकूणच २०२४ मध्ये तब्बल ७.६ लाखाहून अधिक भारतीय परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. upGrad Study Abroad चे प्रणीत सिंग म्हणाले की, “विद्यार्थ्यांची निवड आता फक्त देशांवर अवलंबून नसते, तर खर्च, करिअर संधी आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन केली जाते. त्यामुळे पारंपरिक पाश्चात्य देशांवर अवलंबून राहण्याचा कल कमी झाला आहे.”