लंडन : ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबाचे प्रमुख आणि बोफोर्स घोटाळ्यात भावांसह आरोपी ठरलेले गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडन येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, पुत्र संजय व धीरज आणि कन्या रिटा असा परिवार आहे.
ते गेल्या काही आठवड्यांपासून आजारी होते आणि लंडनमधील रुग्णालयात त्यांचे निधन झाले, अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली.
१९४० मध्ये जन्मलेले गोपीचंद हे हिंदुजा बंधूंपैकी दुसरे होते. या चौघा भावांनी मिळून हिंदुजा समूहाला वाहन, ऊर्जा, बँकिंग आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील जागतिक समूहात रूपांतरित केले. मोठे बंधू श्रीचंद हिंदुजा यांचे २०२३ मध्ये निधन झाल्यानंतर गोपीचंद यांनी ३५ अब्ज पौंड मूल्य असलेल्या हिंदुजा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले.
मुंबईच्या जयहिंद कॉलेजमधून १९५९ मध्ये पदवी घेतल्यानंतर गोपीचंद यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात कुटुंबाच्या तेहरानमधील व्यापारातून केली आणि नंतर त्यांनी व्यवसायाचा विस्तार विविध खंडांपर्यंत केला.
त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने १९८४ मध्ये ‘गल्फ ऑइल’ आणि १९८७ मध्ये ‘अशोक लेलँड’चे अधिग्रहण केले. ही भारतातील पहिली मोठी परदेशी गुंतवणूक होती. आज ‘अशोक लेलँड’ ही भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात यशस्वी पुनरुज्जीवन कथा मानली जाते. गोपीचंद, श्रीचंद आणि प्रकाश हिंदुजा यांच्यावर स्वीडिश कंपनी ‘एबी बोफोर्स’ला भारतातील करार मिळवून देण्यासाठी ६४ कोटी रुपयांचे कथित कमिशन घेतल्याचा आरोप होता, मात्र २००५ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता केली. हिंदुजा कुटुंब ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत म्हणून कायम आहे. त्यांची संपत्ती सध्या ३५.३ अब्ज पौंड आहे. गोपीचंद हिंदुजा यांचे वडील, परमानंद हिंदुजा यांनी १९१४ मध्ये ब्रिटिश भारतातील सिंध प्रांतात गालिचे, चहा आणि मसाले यांचा व्यापार सुरू करून हिंदुजा समूहाची पायाभरणी केली. १९१९ मध्ये ते सिंध (आताचा पाकिस्तान) सोडून इराणला गेले, जिथे त्यांच्या मुलांनी चित्रपट वितरण आणि इतर क्षेत्रांत व्यवसायाचा विस्तार केला.
१९७१ मध्ये निधन होईपर्यंत परमानंद यांनी आपल्या मुलांना एकच मंत्र दिला होता, ‘सगळं सगळ्यांचं आहे, आणि कुणाचं काही नाही.’ मात्र, नंतर हिंदुजा बंधूंमध्ये सत्तासंघर्ष निर्माण झाला आणि त्यांनी त्या तत्त्वपत्रावरून मागे हटण्याचे ठरवले, ज्यामुळे समूह विभाजनाची शक्यता निर्माण झाली.