गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर 'हमास' गाझात युद्धविराम करण्यास तयार झाला आहे. ट्रम्प यांच्या आराखड्यानुसार, सर्व जिवंत व मृत अपहृतांची सुटका करण्यास तसेच गाझा प्रशासन सोडण्यासही 'हमास' तयार झाला आहे.
'हमास'ने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या आठवड्यात जाहीर केलेल्या शांतता करारातील काही तरतुदींबाबत चर्चा गरजेची आहे.
'अल जजीरा' च्या माहितीनुसार, हमासकडून जे उत्तर आले आहे, त्यात शस्त्रास्त्र खाली ठेवण्याचा उल्लेख नाही.
हमासच्या घोषणेनंतर ट्रम्प यांनी इस्रायलला तत्काळ गाझातील हल्ले बंद करण्यास सांगितले, तर इस्रायलने सांगितले की, ट्रम्प यांच्या गाझा प्लॅनवर काम करण्यास आम्ही तयार आहोत. ट्रम्प यांच्या नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यातील धोरणे लागू करण्यास इस्रायल तयार आहे. त्यासाठी ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत एकत्रित काम करतील. त्यामुळे युद्ध संपू शकेल. तसेच गाझात हल्ले रोखण्यास इस्रायल तयार झाला. इस्रायल सरकारने गाझातील कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. फक्त गरज पडल्यास कारवाई करा, असे आदेशात म्हटले आहे.
हमास आता ४८ अपहृतांची सुटका करण्यास तयार झाला. त्यातील २० जण जिवंत आहेत, असा दावा केला जात आहे. युद्धविराम लागू झाल्यानंतर ७२ तासांत अपहृतांची सुटका केली जाईल. त्याबदल्यात इस्त्रायलच्या तुरुंगातील २ हजार पॅलेस्टिनी कैदी सोपवले जातील. यानंतर इस्त्रायल गाझा सोडण्याचा पहिला टप्पा पूर्ण करतील.