न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : द्विपक्षीय व्यापार करारावरील भारतासोबतच्या वाटाघाटी चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि मला वाटते की वॉशिंग्टन नवी दिल्लीसोबत करार करेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाल्याने उभय देशांतील व्यापार करार लवकर मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. अमेरिकेचे आशियाई व्यापारी भागीदार आणि सहयोगी देश करार करण्याच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांनी मंगळवारी त्यांच्या दुसऱ्या प्रशासनाच्या पहिल्या १०० दिवसांच्या निमित्ताने मिशिगनमध्ये एका रॅलीसाठी व्हाईट हाऊसमधून निघण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना वरील टिप्पणी केली.
भारताशी उत्तम प्रकारे चर्चा सुरू आहे. मला वाटते की आमचा भारताशी करार होईल, असे अध्यक्ष म्हणाले.
तुम्हाला माहिती आहेच की, पंतप्रधान (नरेंद्र मोदी) तीन आठवड्यांपूर्वी येथे होते आणि ते करार करू इच्छितात. काय होते ते पाहू, असे त्यांनी पुढे म्हटले.
पंतप्रधान मोदी फेब्रुवारीच्या अखेरीस व्हाईट हाऊसला भेट दिली. त्यापूर्वी, ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की अमेरिका भारतासोबत व्यापार कराराच्या खूप जवळ आहे.
गेल्या आठवड्यात उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या भारत भेटीबद्दल पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मला वाटते की त्यांनी आणि (पंतप्रधान नरेंद्र) मोदी यांनी काही चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे मला वाटते की, भारताबाबत काही घोषणा होऊ शकतात. बेसेंट पुढे म्हणाले की ते दक्षिण कोरियासोबतच्या कराराचे आणि जपानसोबतच्या महत्त्वपूर्ण चर्चेचे आराखडे देखील पाहू शकतात.
व्यापार कराराच्या वेळेबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, मला वाटते की आपण भारताशी खूप जवळ आहोत आणि .भारताशी इतर अनेक देशांपेक्षा वाटाघाटी करणे सोपे आहे कारण त्यांच्याकडून खूप जास्त आयात शुल्क आकारले जाते. म्हणून, जेव्हा आपण दशकांहून अधिक काळापासून लावलेल्या या अन्याय्य व्यापार करारांमधून जातो तेव्हा थेट आयात शुल्कांबाबत वाटाघाटी करणे खूप सोपे असते.
व्हान्सच्या भारत भेटीनंतर, त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात अमेरिका-भारत द्विपक्षीय व्यापार करार (बीटीए) साठीच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वपूर्ण प्रगतीचे स्वागत केले. त्यांनी वाटाघाटींसाठी संदर्भ अटींना अंतिम रूप देण्याची औपचारिक घोषणा केली, ज्यामध्ये सामायिक आर्थिक प्राधान्यांबद्दल पुढील चर्चा करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला गेला.
निवेदनानुसार, ‘बीटीए’ दोन्ही देशांमध्ये रोजगार निर्मिती आणि नागरिकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करून एक नवीन आणि आधुनिक व्यापार करारावर वाटाघाटी करण्याची संधी सादर करते जेणेकरून द्विपक्षीय व्यापार आणि पुरवठा-साखळी एकात्मता संतुलित आणि परस्पर फायदेशीर पद्धतीने वाढेल.
भारताचे मुख्य वाटाघाटीकार, वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल हे दोन्ही देशांमधील पहिल्या प्रत्यक्ष चर्चेसाठी संघाचे नेतृत्व करत आहेत. १५ एप्रिल रोजी, वाणिज्य सचिव सुनील बार्थवाल यांनी सांगितले की भारत अमेरिकेसोबत शक्य तितक्या लवकर वाटाघाटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये वॉशिंग्टनमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात, अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी २०२५ च्या ऑक्टोबरपर्यंत परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय बीटीएच्या पहिल्या टप्प्यावर वाटाघाटी करण्याची योजना जाहीर केली.
याआधी ट्रम्प यांनी भारताला ‘टॅरिफ किंग’ आणि मोठा गैरवापर करणारा म्हटले आहे. १३ फेब्रुवारी रोजी व्हाईट हाऊसमध्ये मोदींसोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले होते की भारत खूप जास्त टॅरिफ आकारतो आणि मी त्यांना दोष देत नाही, पण व्यवसाय करण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे. भारतात विक्री करणे खूप कठीण आहे कारण त्यांच्याकडे व्यापार अडथळे आहेत, खूप मजबूत टॅरिफ आहेत.
भारतासाठी अमृतकाल आणि अमेरिकेसाठी सुवर्णकाळ
भारतासाठी अमृतकाल आणि अमेरिकेसाठी सुवर्णकाळ या त्यांच्या संबंधित दृष्टिकोनांद्वारे मार्गदर्शित, व्यापार करार दोन्ही देशांमधील कामगार, शेतकरी आणि उद्योजकांसाठी वाढीच्या नवीन संधी निर्माण करेल अशी अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले आहे. प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर भारतीय आणि अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये चर्चा सुरू झाली, ज्याचा उद्देश समस्या सोडवणे आणि वाटाघाटींना चालना देणे हा होता.