लग्न झालं, हनिमूनला निघाले अन्... ; अमेरिकेत भारतीय वंशाच्या पायलटचा दुर्दैवी मृत्यू, थोडक्यात बचावली पत्नी (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

लग्न झालं, हनिमूनला निघाले अन्... ; अमेरिकेत भारतीय वंशाच्या पायलटचा दुर्दैवी मृत्यू, थोडक्यात बचावली पत्नी

लग्नाचा स्वागत समारंभ झाल्यानंतर नवविवाहित जोडपे विमानतळाकडे रवाना झाले होते. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात नवविवाहित भारतीय वंशाच्या तरुणावर काळाने घाला घातला. लग्नाच्या अवघ्या काही तासांनंतर हेलिकॉप्टर दुर्घटनेत केरळमधील २६ वर्षीय डेव्ह फिजी याचा मृत्यू झाला. हनिमूनसाठी पत्नीसोबत निघालेल्या डेव्ह याच्या आयुष्याचा प्रवास अर्ध्यावरच थांबला, तर गंभीर जखमी झालेली पत्नी जेस्नी हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, मूळचा केरळचा असलेला डेव्ह फिजी हा डेल्टा एअर लाइन्समध्ये पायलट म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी त्याचा जेस्नीसोबत विवाह झाला होता. दोघांची ओळख तब्बल दहा वर्षांपूर्वी न्यू टेस्टामेंट चर्चमध्ये झाली होती. डॉसनव्हिलमधील 'द रिव्हियर' येथे पार पडलेल्या या लग्नाला ४०० पाहुणे उपस्थित होते.

दुर्गम जंगलात हेलिकॉप्टर कोसळले

लग्नाचा स्वागत समारंभ झाल्यानंतर नवविवाहित जोडपे रॉबिन्सन R66 हेलिकॉप्टरमधून डीकॅलब-पीचट्री विमानतळाकडे रवाना झाले होते. मात्र, हे हेलिकॉप्टर नियोजित ठिकाणी पोहोचलेच नाही. काही वेळानंतर डॉसन काउंटीतील माउंट व्हर्नन ड्राइव्हजवळील दुर्गम जंगलात हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त समोर आले.

गंभीर अपघातात डेव्हचा मृत्यू

या दुर्घटनेत हेलिकॉप्टरच्या पायलटलाही जीव गमवावा लागला. त्याची ओळख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, जखमी अवस्थेत जेस्नी जवळपास सहा तास हेलिकॉप्टरच्या अवशेषांमध्ये अडकून पडली होती.

"ती शुद्धीवर आली तेव्हा डेव्ह तिच्या कुशीत होता. अपघातामुळे तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याचे शरीर पूर्णपणे थंड पडले होते. ती नर्स असल्याने तिला लगेचच समजले की डेव्ह आता या जगात नाही," अशी हृदयद्रावक माहिती डेव्हचे वडील जॉर्ज फिजी यांनी 'अटलांटा न्यूज फर्स्ट'शी बोलताना दिली.

माझा मुलगा खूप आनंदी होता...

"माझा मुलगा खूप आनंदी होता. पण उड्डाणापूर्वी त्याने हवामानाबाबत चिंता व्यक्त केली होती. दृश्यमानता पूर्णपणे शून्य असल्याचे त्याने हेलिकॉप्टरच्या पायलटला सांगितले होते," असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून हेलिकॉप्टर कोसळण्यामागील नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही.

मुंबईतील धोकादायक चार पादचारी पूल बंद; मस्जिद, माटुंगा स्थानकांवरील वाहतूक रोखणार

Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद

BRICS Summit 2026 : पहलगाम हल्ल्याचा 'ब्रिक्स'कडून निषेध; 'नवी दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले

Navi Mumbai : एमपीएससी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद

Kolhapur : माधुरी हत्तीणीचे जंगी स्वागत, Video