कॅनडामधील टोरंटो शहरात भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो स्कारबरो कॅम्पसजवळ मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) रात्री भारतीय विद्यार्थी शिवांक अवस्थी याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
अवघ्या २० वर्षांचा शिवांक अवस्थी डॉक्टरेट (PhD) चे शिक्षण घेत होता. हायलँड क्रीक ट्रेल आणि ओल्ड किंग्स्टन रोड परिसरात वैयक्तिक वादातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. टोरंटो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा जखमी अवस्थेत शिवांक आढळून आला. तपासादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणात किती जण सहभागी होते, याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने अजून कोणाला अटक करण्यात आली नाही.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, नागरिकांना संशयितांविषयी माहिती मिळाली तर ४१६-८०८ -७४०० या क्रमांकावर किंवा Crime Stoppers (४१६-२२२-TIPS) वर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर कॅनडामधील भारताच्या टोरोंटो येथील वाणिज्य दूतावासाने दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया X वरील निवेदनात दूतावासाने सांगितले की, “शिवांक अवस्थी या भारतीय डॉक्टरेट विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूने आम्ही व्यथित आहोत. या कठीण काळात दूतावास कुटुंबाच्या संपर्कात असून स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे.”
टोरंटो सनच्या वृत्तानुसार, ही यंदाच्या वर्षातील टोरोंटोमधील ४१ वी हत्या आहे.
अजून एका भारतीय वंशाच्या महिलेची हत्या
काही दिवसांपूर्वीच टोरंटोमध्येच ३० वर्षीय भारतीय वंशाची महिला हिमांशी खुराणा हिचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी सांगितले की, १९ डिसेंबरच्या रात्री बेपत्ता व्यक्तीबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी, अधिकाऱ्यांना त्या महिलेचा मृतदेह एका घरात आढळला आणि नंतर या प्रकरणाला हत्येचे प्रकरण म्हणून घोषित करण्यात आले. या प्रकरणात तिच्या ओळखीच्या अब्दुल गफूरी (३२) याच्याविरोधात कॅनडात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.