

मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालय (MEA) ने विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, संकटग्रस्त भागातील भारतीय नागरिकांना तातडीची मदत आणि माहिती देण्यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्स (X) वर माहिती देताना सांगितले की, हे नियंत्रण कक्ष दररोज सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत कार्यरत राहील. नागरिकांच्या मदतीसाठी मंत्रालयाने १८०००११८७९७ (टोल-फ्री), +९१ ११ २३०१ २११३, +९१ ११ २३०१ ४१०४ आणि +९१ ११ २३०१ ७९०५ हे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
याशिवाय, संकटग्रस्त भागातील भारतीय नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी मंत्रालयाने संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे आपत्कालीन संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत. यात बहरीन, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, कुवैत, लेबनॉन, ओमान, कतार, रामल्ला, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे.
संवाद आणि कूटनीतीवर भर
मंगळवारी (दि.३) जारी केलेल्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने पश्चिम आशियातील संघर्ष लवकर संपवण्यासाठी संवाद आणि कूटनीतीचा (Dialogue and Diplomacy) मार्ग स्वीकारण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले. रणधीर जयस्वाल म्हणाले की, परिस्थिती शांत करण्यासाठी भारत आपला आवाज उठवत आहे. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.
भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
आखाती प्रदेशात सुमारे एक कोटी भारतीय नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा भारत सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. "या प्रदेशातील घडामोडींचा भारतावर परिणाम होणार नाही, असे होऊ शकत नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "पश्चिम आशियातून महत्त्वाचे व्यापार मार्ग आणि ऊर्जा पुरवठा साखळी भारताशी जोडलेली आहे. त्यामुळे या प्रदेशातील मोठा अडथळा भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकतो."
व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांना भारताचा विरोध
जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांना भारत ठामपणे विरोध करतो. अलीकडील समुद्री घटनांमध्ये काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून काहीजण बेपत्ता असल्याची माहितीही त्यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, संघर्ष केवळ तीव्रच झाला नाही, तर तो इतर देशांमध्येही पसरत असून काही भागांमध्ये दैनंदिन जीवन आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
रमजान महिन्यात तणाव वाढल्याची खंत
२८ फेब्रुवारी रोजी इराण आणि आखाती प्रदेशात संघर्ष सुरू झाल्यानंतर भारताने याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली होती. सर्व पक्षांनी संयम राखून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही भारताने केले होते. विशेष म्हणजे पवित्र रमजान महिन्यात परिस्थिती आणखी बिघडल्याबद्दल जयस्वाल यांनी खंत व्यक्त केली.
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की प्रभावित देशांमधील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास भारतीय नागरिकांशी तसेच स्थानिक समुदाय संघटनांशी सतत संपर्कात आहेत. नियमित सूचना जारी करून अडकलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.