तेहरान : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षात कळीचा मुद्दा ठरलेली होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराणने शुक्रवारी केली. लेबनॉन आणि इस्रायलमध्ये झालेल्या १० दिवसांच्या शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर इराणने हे पाऊल उचलले आहे. इराणच्या या घोषणेनंतर काही वेळातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर इराणचे आभार मानले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लेबनॉन आणि इस्रायलमध्ये १० दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत इराणने हा निर्णय घेतला. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, लेबनॉनमधील शस्त्रसंधीला अनुसरून, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांचा प्रवास शस्त्रसंधीच्या उर्वरित कालावधीसाठी पूर्णपणे खुला करण्यात येत आहे. अराघची यांनी स्पष्ट केले की, जहाजांना इराणच्या 'पोर्ट्स अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशन'ने आधीच जाहीर केलेल्या 'समन्वित मार्गावरून' प्रवास करणे अनिवार्य असेल.
इराणच्या या घोषणेनंतर काही वेळातच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर इराणचे आभार मानले. ते म्हणाले, इराणने आताच होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केल्याची घोषणा केली आहे. धन्यवाद! होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. या मार्गावरील निर्बंध हटल्यामुळे जागतिक व्यापार आणि इंधन पुरवठ्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
इराणवरील नाकाबंदी सुरूच राहील - ट्रम्प
अमेरिकेने इराणविरुद्धच्या आपल्या लष्करी मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. इराणच्या बंदरांच्या नाकेबंदीपलीकडे जात, आता जगभरात कुठेही इराणशी संबंधित किंवा इराणला मदत करणारी जहाजे रोखण्याचे आदेश अमेरिकन सैन्याला देण्यात आले आहेत. यामध्ये शस्त्रे, तेल, धातू आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची ने-आण करणाऱ्या संशयास्पद जहाजांचा समावेश आहे. इराणने होर्मुझ खुले केले असले तरी इराणवरील नाकाबंदी कायम राहील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
१४ जहाजे परतली
यूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, नाकेबंदीच्या पहिल्या तीन दिवसांतच १४ व्यापारी जहाजांनी अमेरिकन नौदलाशी संघर्ष टाळण्यासाठी आपला मार्ग बदलला आहे. अनेक जहाजांनी आपले 'रेडिओ ट्रान्सपाँडर्स' बंद केले असून काही जहाजे इराणच्या किनाऱ्याकडे परत जात असल्याचे सॅटेलाईट डेटावरून दिसून येत आहे.
बळाचा वापर करण्यास मागे हटणार नाही
जर कोणत्याही जहाजाने नाकेबंदी ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर आमचे सैनिक नियोजित डावपेचांनुसार त्या जहाजाचा ताबा घेतील. प्रसंगी चेतावणी देण्यासाठी गोळीबार केला जाईल, असा इशारा जनरल केन यांनी दिला. संरक्षणमंत्री हेगसेथ यांनी माहिती दिली की, अमेरिकेच्या एकूण नौदल शक्तीपैकी १० टक्क्यांहून कमी भाग या नाकेबंदीसाठी वापरला जात आहे. सध्या मध्यपूर्वेत १६ युद्धनौका तैनात आहेत, ज्यात ११ विनाशिका आणि एका विमानवाहू युद्धनौकेचा समावेश आहे. या मोहिमेला अत्याधुनिक ड्रोन आणि उपग्रहांच्या माध्यमातून गुप्तचर माहिती पुरवली जात आहे.
युद्धविराम संपुष्टात येण्याच्या मार्गावर
इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील सात आठवड्यांच्या युद्धानंतर झालेला तात्पुरता युद्धविराम काही दिवसांतच संपणार आहे. मध्यस्थ या युद्धविरामाचा कालावधी वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच, अमेरिकेने उचललेले हे पाऊल इराणवर दबाव वाढवणारे मानले जात आहे.
इस्रायल-लेबनॉन १० दिवसांचा युद्धविराम लागू
इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह या कट्टरपंथी गटादरम्यान गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धानंतर अखेर शुक्रवारी मध्यरात्रीपासून १० दिवसांचा युद्धविराम लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे केवळ लेबनॉनमधील संघर्षच नव्हे, तर इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या व्यापक तणावावरही पडदा पडण्याची चिन्हे आहेत.
कराराची घोषणा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे, इस्रायलचा हा संघर्ष थेट लेबनॉनच्या लष्कराशी नसून इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाह या गटाशी आहे. जरी हिजबुल्लाह अधिकृतपणे या कराराचा भाग नसला, तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
करारातील मुद्दे
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, शांततेसाठी हा निर्णय घेतला असला तरी इस्रायली सैन्य मागे हटणार नाही. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये १० किमी (६ मैल) अंतरापर्यंत 'सुरक्षा क्षेत्र' तयार केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले की, नियोजित हल्ले रोखण्यासाठी इस्रायलला 'स्वसंरक्षणाचा अधिकार' असेल, मात्र ते लेबनॉनच्या नागरी किंवा लष्करी लक्ष्यांवर कोणतेही नवीन हल्ले करणार नाहीत. हिजबुल्लाहने इस्रायली सैन्याच्या उपस्थितीला विरोध दर्शवला असून, त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा आपला हक्क कायम असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानकडून शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तयारी
पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी आणि विस्कळीत झालेला जागतिक ऊर्जा पुरवठा सुरळीत करण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यातील उच्चस्तरीय चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे यजमानपद भूषवण्यास पाकिस्तानने सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात ही महत्त्वपूर्ण चर्चा पार पडणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ
चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येत आहे. इतर प्रांतांतून हजारो पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान पाचारण करण्यात आले आहेत. पहिल्या फेरीच्या वेळी १०,००० हून अधिक सुरक्षा जवान तैनात होते, यावेळी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
...तर इस्लामाबादला जाणार - ट्रम्प
या शांतता प्रक्रियेला गती देणारे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसबाहेर ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, जर इस्लामाबादमध्ये अंतिम करारावर स्वाक्षरी होणार असेल, तर मी तेथे नक्कीच जाईन. त्यांना माझी तेथे उपस्थिती हवी आहे. इराणने चर्चेतील जवळपास सर्व अटी मान्य केल्या आहेत. ट्रम्प यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ व फिल्ड मार्शल मुनीर यांच्या कौशल्याचे कौतुक केले असून, युद्धविराम संपण्यापूर्वीच तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
युरेनियमचा साठा सोपवण्यास इराण सहमत - ट्रम्प
इराणने आपला समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्यास सहमती दर्शवली आहे, असा दावा ट्रम्प यांनी गुरुवारी केला. सहा आठवड्यांचा संघर्ष संपुष्टात आणू शकणाऱ्या कराराच्या जवळ दोन्ही पक्ष पोहोचले असल्याचा दावाही त्यांनी केला. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना, ट्रम्प यांनी या घडामोडीला सुरू असलेल्या वाटाघाटींमधील एक मोठे यश म्हणून संबोधले.
कच्च्या तेलाचे दर कमी होणार?
होर्मुझ बंद झाल्यामुळे जगावर मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले होते आणि याचा भारताला देखील मोठा फटका बसला होता. देशात एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कच्च्या तेलाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र, आता होर्मुझ पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. तसेच कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडाही दूर होणार असून पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.